तीन मंगल कार्यालये भुईसपाट

By Admin | Updated: May 28, 2014 00:42 IST2014-05-28T00:42:26+5:302014-05-28T00:42:26+5:30

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने चिंचवड, वाल्हेकरवाडी परिसरातील अनधिकृत मंगल कार्यालये पाडण्याची कारवाई आजपासून सुरू केली

Three Mangal Kshetra Bhuiyan Patta | तीन मंगल कार्यालये भुईसपाट

तीन मंगल कार्यालये भुईसपाट

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या वतीने चिंचवड, वाल्हेकरवाडी परिसरातील अनधिकृत मंगल कार्यालये पाडण्याची कारवाई आजपासून सुरू केली. दिवसभरात कडेकोट बंदोबस्तात दोन मंगल कार्यालये भुईसपाट करण्यात आली. पाऊस असतानाही बांधकामे पाडण्यात आली. आणखी तीन दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे. काही महिने थंडावलेली अनधिकृत बांधकामांविरोधातील मोहीम प्राधिकरणाने आजपासून सुरू केली. सकाळी सातपासून मोठ्या पोलीस बंदोबस्तात कारवाईला सुरुवात झाली. सुरुवातीला वाल्हेकरवाडी रस्त्याच्या बाजूस असणारे आहेर गार्डन पाडायला सुरुवात झाली. दुपारी बारापर्यंत आहेर गार्डन आणि आहेर लॉन्स पाडले. दुपारनंतर माऊली मंगल कार्यालय पाडले. अनधिकृत बांधकामांवरील कारवाईमुळे चिंचवडकडून वाल्हेकरवाडीकडे जाणार्‍या रस्त्यावरील कै. धोंडूतात्या चिंचवडे चौकापासून वाल्हेकवाडी चौकापर्यंतची वाहतूक बंद केली होती. बॅरिकेट्स लावून रस्ता बंद केला होता. त्यामुळे चिंचवड गावातून वाल्हेकरवाडीस जाणारा आणि रावेतकडून चिंचवडगावात येणार्‍या वाहनांना वळसा मारून जावे लागत होते. त्यामुळे वाहने बिजलीनगर चौक मार्गे रावेतला जात होती. या भागातून झालेला जनविरोध पाहता कारवाईच्या ठिकाणी मोठ्याप्रमणावर पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. अग्निशामक दल, शीघ्र कृतीदलाची तुकडीही तैणात होती. त्यामुळे कारवाईच्या ठिकाणी जाण्यास मज्जाव केला होता. पाऊस असतानाही कारवाई सुरू होती. सायंकाळी सहाला कारवाई थांबविण्यात आली. प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे यांच्या मार्गदशर्नाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण पांढरे, कार्यकारी अभियंता चंद्रकांत जावळे, क्षेत्रीय अधिकारी सुरेश अभंग यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई सुरू झाली. प्राधिकरणाचे सुमारे ५० हून अधिक कर्मचारी कारवाईत सहभागी झाले होते. दोन पोकलेन, तीन जेसीबीचा वापर यासाठी केला आहे. याच भागात तीन दिवस कारवाई सुरू राहणार आहे. प्रमुख ३२ पोलीस अधिकार्‍यांसह तीनशे पोलीस कर्मचारी येथे तैनात होते. अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई सुरूच राहणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Three Mangal Kshetra Bhuiyan Patta