कळंब परिसरात तीन बिबट्यांचा वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:10 IST2021-09-19T04:10:57+5:302021-09-19T04:10:57+5:30
मंचर: आंबेगाव तालुक्यातील कळंब परिसरात मागील पंधरा दिवसांपासून बिबट्यांचा उपद्रव वाढला आहे. शीलमळा परिसरात तीन बिबट्यांचा वावर आहे. ...

कळंब परिसरात तीन बिबट्यांचा वावर
मंचर: आंबेगाव तालुक्यातील कळंब परिसरात मागील पंधरा दिवसांपासून बिबट्यांचा उपद्रव वाढला आहे. शीलमळा परिसरात तीन बिबट्यांचा वावर आहे. कळंब गावाकडे दोन तरुण जात असताना तीन बिबट्यांनी त्यांना दर्शन दिले. अंधार पडल्यावर शेतकऱ्यांना घराबाहेर पडण्याची भीती वाटू लागली आहे. आंबेगाव तालुक्यातील बिबट प्रवण क्षेत्रात शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
दरम्यान, बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी वनविभागाने परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी सरपंच राजश्री भालेराव व उपसरपंच डॉ. सचिन भालेराव यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी गौरव भालेराव व विनोद भालेराव हे चारचाकी वाहनातून कळंब गावाकडे जात होते. राजेश भालेराव यांच्या घराजवळ एक बिबट्या अडवा गेला. तर दुसरा एका गोठ्याकडे दबा धरून बसला होता. तर ओढ्याच्या पलीकडे अजून एका बिबट्याने दर्शन दिले. परिसरात तीन बिबट्यांचा वावर असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे येथून प्रवास करताना नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कळंब ग्रामपंचायत हद्दीतील शीलमळा, सिरामळा, माळीमळा, बागवस्ती, महानुभवमळा, कळंब कॉलनी, दगडीमळा, गणेशवाडी या परिसरात देखील बिबट्यांचा उपद्रव आहे.
शीलमळा परिसरातून रात्री डॉ. सचिन भालेराव घराकडे चारचाकी वाहनातून जात होते. अचानकपणे बिबट्या गाडीसमोरून जात असताना दिसला. क्षणभर त्यांना काही सुचेना. जवळपास १० ते १५ मिनिटे बिबट्या तेथे होता.चारचाकी वाहनांमुळे माझा जीव वाचल्याचे त्यांनी सांगितले. मोटार सायकलस्वरांनी येथून रात्री ये-जा करू नये असे आवाहन त्यांनी केले. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने लपन आहे. त्यामुळे या परिसरात बछड्यांसह मादी फिरत असल्याचे अनेकांनी पाहिले आहे.बिबट्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस पाणी भरणे भीतीदायक होत आहे, शीलमळा परिसरात वसंत बबन भालेराव यांच्या कालवडीचा गेल्या आठवड्यात बिबट्याने फडशा पाडला आहे. त्यामुळे शीलमळा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. रात्री आठ नंतर या भागातील नागरिकांना घराबाहेर पडणेही धोक्याचे होऊ लागले आहे.