कार-बस अपघातात तीन ठार

By Admin | Updated: August 11, 2014 23:31 IST2014-08-11T23:00:42+5:302014-08-11T23:31:54+5:30

वळसेजवळ दुर्घटना : चालकासह अडीच वर्षांचा चिमुरडा गंभीर; मृत दाम्पत्य कोल्हापूरचे

Three killed in car accident | कार-बस अपघातात तीन ठार

कार-बस अपघातात तीन ठार

नागठाणे (जि. सातारा) : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वळसे गावाजवळ कार व खासगी प्रवासी बस यांच्यात झालेल्या धडकेत तिघांचा मृत्यू झाला असून, दोघे जखमी आहेत. त्यातील चालक हा कोमात गेला असून, अडीच वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी आहे. हा अपघात आज, सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास झाला. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून कोल्हापूरच्या दिशेने कार (एमएच ०९ सीएम ४०३१) निघाली होती. कार आज, सोमवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास वळसे, ता. सातारा हद्दीत आली असता, गाडीवरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे ही गाडी रस्ता दुभाजक सोडून महामार्गाच्या विरुद्ध मार्गावर जाऊन पुण्याकडे निघालेल्या खासगी प्रवासी बस (एमएच ०८ बी ९०२८) ला
जाऊन धडकली. यामध्ये कारमधील प्रकाश घिसुलाल कोठारी (वय ३८), पत्नी सुचिता (३१ दोघे रा. जाधववाडी, मार्केट यार्ड, कोल्हापूर), संजय छगनलाल जैन (३५, रा. चेन्नई) यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक विक्रम दरेकर व प्रकाश कोठारी यांचा मुलगा अंश (२) हे गंभीर जखमी झाले आहेत. चालक दरेकर कोमात गेला आहे. हा अपघात एवढा गंभीर होता की, कारचा चक्काचूर झाला. खासगी प्रवासी बसचेही मोठे नुकसान झाले. अपघाताची माहिती मिळताच महामार्गावर गस्त घालत असलेले पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी जखमींना पोलीस गाडीतूनच जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नागठाणे पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, पोलीस उपनिरीक्षक कदम तपास करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Three killed in car accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.