तीन तासांतच दरोडेखोर गजाआड
By Admin | Updated: September 1, 2014 05:29 IST2014-09-01T05:29:53+5:302014-09-01T05:29:53+5:30
पेट्रोल पंपावर दरोडा पडतो.... नियंत्रण कक्षाला माहिती मिळते....पोलीस काही मिनिटांत घटनास्थळी पोहचतात...

तीन तासांतच दरोडेखोर गजाआड
पिंपरी : पेट्रोल पंपावर दरोडा पडतो.... नियंत्रण कक्षाला माहिती मिळते....पोलीस काही मिनिटांत घटनास्थळी पोहचतात... तातडीने ठिकठिकाणी पथके पाठविली जातात अन् अवघ्या तीन तासांत दरोडेखोरांना जेरबंद केले जाते. ही चित्रपटाची कथा नसून, भोसरी पोलिसांनी रविवारी पहाटे केलेली कामगिरी आहे.
गोरख नामदेव बोडके (वय २१), संजय नागेश जाधव (वय १९), गणेश संभाजी चव्हाण (वय २१), अनिल दादा सावंत (वय २०), गणेश बाळू सकट (वय १९, सर्व रा. पत्राशेड वसाहत, कासारवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी परशुराम गायकवाड (वय ३१, रा. फुगेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.
सहायक पोलीस निरीक्षक जी. एन. कडाळे यांनी दिलेली माहिती अशी : दापोडीतील कुंदननगर येथे साईगौरी गॅस पेट्रोलपंप आहे. गोरख बोडके व त्याचे साथीदार रविवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास पेट्रोल भरण्याच्या बहाण्याने पंपावर गेले. त्यांच्याकडे लाकडी दांडके, कोयते होते. आरोपींनी पंपावरील रोखपाल गायकवाड यांच्या डोळ्यावर मारहाण करून त्यांच्या खिशातील १४ हजार ३६० रुपयांची रोकड काढून घेतली.
यानंतर गायकवाड यांनी तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. नियंत्रण कक्षाकडून भोसरी पोलिसांना कळविण्यात आले. काही मिनिटांतच पोलीस पंपावर पोहोचले. घटनेची माहिती घेतल्यानंतर ठाण्यात फिर्याद नोंदविली. (प्रतिनिधी)