पिंपरी : शिवसेनेचे पुनावळे-ताथवडे विभागप्रमुख राजेश ऊर्फ राजाभाऊ सखाराम दर्शिले (वय ४५, रा. माळवाडी, पुनावळे) यांच्या खूनप्रकरणातील तीन आरोपींना गुलबर्गा येथून अटक करण्यात हिंजवडी पोलिसांना यश आले आहे. आरोपीच्या प्रेमसंबंधास झालेला विरोध आणि स्थानिक जमीन बांधकाम व्यावसायिकांना मिळवून दिल्याच्या रागातून हा खून झाल्याचे तपासात समोर आले आहे. घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींची ओळख पटली असून, आरोपींकडून दोन गावठी पिस्तुले हस्तगत केली आहेत.सचिन सुदाम कुदळे (वय ३१, रा. माळवाडी, पुनावळे), शाहरुख ऊर्फ पाप्या रशिद शेख (वय २०, रा. भेलकेवाडी, ता. भोर), गौतम श्रीराम मोरे (वय ३३, रा. विठ्ठलनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत; तर मोहन ऊर्फ बाबू जनार्दन मुजुमले (रा. जमदाडे चाळ, भुजबळवस्ती, वाकड), प्रकाश डोंगरे (रा. डिलक्स टॉकीजजवळ, पिंपरी) यांना ताब्यात घेतले आहे. घटना घडली त्या दिवशी या गुन्ह्यातील आरोपींना तत्काळ अटक करावी, या मागणीसाठी दर्शिले यांच्या नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने थेरगावातील खासगी रुग्णालयासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. (प्रतिनिधी)
दर्शिले खूनप्रकरणी तिघा आरोपींना अटक
By admin | Updated: November 3, 2014 04:56 IST