बेल्हा : साकोरी (ता. जुन्नर) येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील सार्वजनिक शौचालयालगत शासनाच्या गायरान जागेवर येथीलच काही लोकांनी अतिक्रमण करून हे लोक सार्वजनिक शौचालयामध्ये जाणाऱ्या लोकांना धमकावीत आहे. शौचालयामध्ये जाणाऱ्या युनिटच्या दरवाजात काटे टाकून बंद केली असल्याची तक्रार ग्रामपंचायत सदस्या सुभद्रा साळवे यांनी केली आहे.याबाबत पत्रकात म्हटले आहे की, वॉर्ड क्रमांक ४ मध्ये सन २०१३-१४ साली लोकवस्तीला सार्वजनिक शौचालय बांधलेली आहे. काही नतद्रष्ट लोकांमुळे ज्यांना गावाचा विकास होऊ द्यायचा नाही, असे लोकच अशी कृत्य करीत आहेत. शौचालयालगतच्या जागेवरच अतिक्रमण करून शौचालयाच्या टाक्यांवर गुरे बांधतात. तसेच गावरान जागेत गुरांचा गोठा, टपऱ्या व गाळे बांधलेले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या सार्वजनिक शौचालयामध्ये जाणाऱ्या व त्याचा वापर करणाऱ्या लोकांना संबंधित व्यक्ती शिवीगाळ करून धमकावून मारहाण करण्याची भाषा करीत आहेत. याबाबत सुभद्रा साळवे यांनी ग्रामपंचायतीकडे, ग्रामसभेमध्ये अनेक वेळा तक्रार करूनही त्या संबंधित व्यक्तींवर कोणतीही कारवाई केली नाही. संबंधित काही लोक शौचालयाचा वापर करणाऱ्या लोकांना त्रास देत आहे. या संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करून, शासकीय जागेवरील अतिक्रमण काढून टाकून ही सार्वजनिक शौचालये नागरिकांसाठी खुली करुन द्यावीत, अशी मागणी केली आहे. अन्यथा, महिला ग्रामपंचायत सदस्यत्वाचा राजीनामा देण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या पत्राच्या प्रती गटविकास अधिकारी तहसीलदार आदींना देण्यात आल्या आहेत. (वार्ताहर)
शौचालयामध्ये जाणाऱ्यांना धमक्या
By admin | Updated: January 23, 2017 02:31 IST