हॉटेलमध्ये काम करत जमविली हजारो दुर्मिळ नाणी
By Admin | Updated: March 12, 2017 03:14 IST2017-03-12T03:14:06+5:302017-03-12T03:14:06+5:30
इच्छा असल्यास मार्ग नक्की भेटतो. मात्र, त्यासाठी कष्ट आणि सातत्य महत्त्वाचे असते. पौंड येथील सखाराम घनवट या तरुणाने ही म्हण सार्थ केली आहे. आई-वडिलांचे

हॉटेलमध्ये काम करत जमविली हजारो दुर्मिळ नाणी
पौड : इच्छा असल्यास मार्ग नक्की भेटतो. मात्र, त्यासाठी कष्ट आणि सातत्य महत्त्वाचे असते. पौंड येथील सखाराम घनवट या तरुणाने ही म्हण सार्थ केली आहे. आई-वडिलांचे छत्र लहाणपणीच हरवले असतानाच घरची जबाबदारी पार पाडण्यासाठी वेटरची नोकरी पत्करली, अशा प्रतिकूल परिस्थितीतही आपला छंद जोपासत जवळपास ३४ प्रकारची हजारो नाणी या तरुणाने संकलित केली आहेत. एवढेच नव्हे, तर त्यांची माहितीही या तरुणाने मिळवली आहे.
सखाराम हा मूळचा वेल्हे तालुक्यातील शिरकोली गावचा. पण, नोकरीच्या निमित्ताने सध्या उरावडे येथे त्याचे वास्तव्य आहे. बालपणीच सखारामच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र हरवले. निराधार झाल्याने सातवीत त्याच्या शिक्षणाची वाट अर्ध्यातच सुटली. निराधार झाल्यावरही खचून न जाता आपले शिक्षण अर्ध्यात सोडून गावची गुरे त्याने वळली. पडेल ते कष्ट करत स्वत:बरोबरच बहिणीचाही भार उचलत आयुष्याची वाटचाल सुखकर करण्याची धडपड कायम चालू ठेवली. विविध छंदही जोपासले.
- हॉटेलात काम करता करता त्याने भारतीय स्वातंत्र्यकाळापासून ते आजतागायत तयार करण्यात आलेली चलनातील ३४ प्रकारची हजारो नाणी जमा करून त्यांच्या माहितीसह संग्रह केला आहे. ही माहिती निश्चित एका कोशासारखी आहे. ही नाणी तो हॉटेलाच्या मालकाकडून, ग्राहकांकडून व मित्रमंडळीकडून जमा करतो. त्याने बनवलेल्या घरट्यात अनेक पक्षांनी आज आसरा घेतला आहे.
बालवयातच आई आणि वडील या दोघांचेही छत्र हरवले असताना नातेवाईकांनी दूर लोटलेले. जगण्याला कशाचा आधार नाही. अशा अंधकारमय परिस्थितीत नशिबाला दोष देत न बसता पडेल ते काम करत आपल्या जगण्याची लढाई यशस्वी करणाऱ्या सखाराम घनवटने दररोजच्या जगण्याची भ्रांत असतानाही मागील काही वर्षांपासून विविध प्रकारचे छंद जोपासून इतरांपुढे एक आदर्श निर्माण केला आहे.