शहरात वाढली हजार मतदान केंद्रे

By Admin | Updated: February 9, 2017 03:34 IST2017-02-09T03:34:13+5:302017-02-09T03:34:13+5:30

आगामी महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागांमध्ये ३ हजार ४३२ मतदान केंद्रे असणार आहेत. मागील निवडणुकीमध्ये अडीच हजार मतदान केंद्रांमार्फत निवडणुका घेण्यात आल्या

Thousands of polling stations in the city | शहरात वाढली हजार मतदान केंद्रे

शहरात वाढली हजार मतदान केंद्रे

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीसाठी ४१ प्रभागांमध्ये ३ हजार ४३२ मतदान केंद्रे असणार आहेत. मागील निवडणुकीमध्ये अडीच हजार मतदान केंद्रांमार्फत निवडणुका घेण्यात आल्या होत्या. यंदा चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होत असल्याने मतदान केंद्रांमध्ये एक हजारने वाढ झाली आहे. या प्रत्येक मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.
चारसदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे एका मतदाराला चार वेळा मतदान करावे लागणार आहे. त्यामुळे मतदान करण्यासाठी जास्तीचा कालावधी लागणार आहे. रांगा लागू नयेत, यासाठी मतदान केंद्रांच्या संख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळही पालिकेला मोठ्या प्रमाणात वाढवावे लागले आहे.
मतदान केंद्रांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना नुकतेच प्रशासनाच्या वतीने प्रशिक्षण देण्यात आले. यंदा पहिल्यांदाच ४ सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार असल्याने ती यशस्वी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर असणार आहे. मतदान केंद्रनिहाय याद्या प्रसिद्ध झाल्यामुळे नेमके कुठे मतदान करावयाचे आहे, हे स्पष्ट होणार आहे.
महापालिकेला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विधानसभानिहाय मतदार याद्या उपलब्ध झाल्या होत्या. त्यानंतर १ फेब्रुवारी २०१७ रोजी १८ वर्षे पूर्ण केलेल्यांची नवमतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी १२ जानेवारी रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली. या प्रारूप रचनेवर ९०९ हरकती प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. त्यामध्ये धनकवडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभागांमध्ये सर्वाधिक ३०७ इतक्या मतदारांच्या अदला-बदली झाल्याच्या हरकती आल्या होत्या, तर सर्वात कमी २२ हरकती घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत प्रभागामध्ये आल्या आहेत. या हरकतींची पडताळणी करून अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. ४६० तक्रारी योग्य असल्याचे स्पष्ट झाले, त्यानुसार योग्य त्या दुरुस्त्या त्यामध्ये करण्यात आल्या आहेत. उर्वरित हरकतींपैकी काही तक्रारी हद्दीबाहेरच्या नागरिकांच्या होत्या. (प्रतिनिधी)

Web Title: Thousands of polling stations in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.