‘त्या’ २२ गावांतील पाणीप्रश्न सुटणार?
By Admin | Updated: August 15, 2014 01:11 IST2014-08-15T01:11:42+5:302014-08-15T01:11:42+5:30
लोकसभा निवडणुकीच्या काळात अडचणीच्या ठरलेल्या बारामती तालुक्यातील २२ गावांचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे.

‘त्या’ २२ गावांतील पाणीप्रश्न सुटणार?
मोरगाव : लोकसभा निवडणुकीच्या काळात अडचणीच्या ठरलेल्या बारामती तालुक्यातील २२ गावांचा पाणीप्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहे. या गावांना पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पाणी युद्धपातळीवर देण्यासाठी यंत्रणा हलली. त्यानुसार आज योजनेच्या वितरिकेची चाचणी घेण्यात आली.
या परिसरातील जोगवडी, तरडोली येथील तळ्यांमध्ये चाचणीचे पाणी सोडण्यात आले. उर्वरित काम युद्धपातळीवर सुरू आहे.
बारामतीच्या २२ गावांत सलग ४ वर्षांपासून पाण्याची भीषण टंचाई आहे. त्यामुळे मागील वर्षापासून या गावातील ग्रामस्थांनी उपोषण, मोर्चा, महिलांचा हंडा मोर्चा, गाव बंद ठेवणे, काळ्या गुढ्या उभारणे अशा प्रकारचे आंदोलने केली. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत या पाणी प्रश्नावर सर्वांचे लक्ष वेधले होते.
पुरंदर उपसासिंचनचे पाणी अखेर चाचणीच्या निमीत्ताने पश्चिम पट्यात पोहचले. येत्या दोन दिवसात परिसरातील तलाव भरले
जाणार आहेत. हा भाग गेल्या ४० वर्षांपासून शेतीसिंंचनाच्या पाण्यासाठी प्रतिक्षेत आहे.
पाण्यासाठी आंदोलने २०१३ च्या ऐन दिपावलीत सुरू झाली. यामध्ये सत्ताधाऱ्यांसह विविध पक्षांतील कार्यकर्त्यांनी उडी घेऊन ‘अभी नहीं तो कभी नहीं’ या उक्तीप्रमाणे आंदोलनात भाग घेतला होता. तालुक्याच्या या पट्यातील आंबी, जोगवडी,
मोरगाव, तरडोली, लोणी भापकर, मुर्टी, मोढवे, मोराळवाडी, पळशी, मासाळवाडी, मुढाळे, जळगाव, सायंबाचीवाडी, जळकेवाडी आदी गावे अजुनही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. (वार्ताहर)