तिसरा ट्रॅक लवकरच
By Admin | Updated: February 17, 2016 00:53 IST2016-02-17T00:53:44+5:302016-02-17T00:53:44+5:30
पुणे-लोणावळादरम्यान तिसऱ्या लाइनसाठी (टॅ्रक) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून (एमआरव्हीसी) सर्वेक्षण सुरू असून, भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे.

तिसरा ट्रॅक लवकरच
पिंपरी : पुणे-लोणावळादरम्यान तिसऱ्या लाइनसाठी (टॅ्रक) मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनकडून (एमआरव्हीसी) सर्वेक्षण सुरू असून, भूसंपादनाचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या ७ ते ८ वर्षांत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित तिसऱ्या लाइनचा (टॅ्रकचा) प्रस्ताव अंतिम टप्प्यात आला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारच्या आर्थिक गुंतवणूक मंडळाकडे मांडण्यात आला असून, त्यावर लवकरच निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पासाठी ९४४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
सध्या पुणे-लोणावळा मार्गावर केवळ दोन लाइन आहेत. त्यामुळे लांब पल्लयांच्या गाड्या आणि लोकल यांच्या वेळापत्रकाची सांगड घालताना, लोकलच्या फेऱ्यांवर परिणाम होत आहे. तसेच गाडी क्रॉसिंगच्या वेळी अनेक गाड्यांना थांबविले जाते. त्यामुळे अनेक गाड्यांना प्रतीक्षा करावी लागते. या समस्या सोडविण्यासाठी तिसरी लाइन टाकण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाकडे पूर्वीच पाठविला आहे. तिसरी लाइन अस्तित्वात आल्यानंतर पुणे ते लोणावळा मार्गावर धावणाऱ्या लोकलची संख्या वाढविण्यास मदत होईल. तसेच लोकलसह लांब पल्लयांच्या गाड्यांचा वेग वाढविणे शक्य होणार आहे.
पुणे-मुंबईदरम्यान रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने रेल्वे गाड्यांची संख्या वाढविणेही शक्य आहे. तसेच, येत्या वर्षात पुण्यासाठी चार गाड्या वाढविण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे गाड्या वाढविल्यानंतरही, प्रत्यक्ष मार्गावरील फेऱ्यांची संख्या वाढविताना दोनच लाइन असल्याने काही मर्यादा येत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.