क्रिकेट, बॉलिवूडपेक्षा देशातील प्रश्नांवर चिंतन व्हावे : विक्रम गोखले
By Admin | Updated: January 12, 2015 02:29 IST2015-01-12T02:29:41+5:302015-01-12T02:29:41+5:30
क्रिकेट, बॉलिवूड आपल्या देशातील कला-क्रीडेचे सांस्कृतिक अधिष्ठान आहे. मात्र, राजकारण हा जिव्हाळ्याचा आणि आपल्या जीवनाशी संबंधित विषय आहे.

क्रिकेट, बॉलिवूडपेक्षा देशातील प्रश्नांवर चिंतन व्हावे : विक्रम गोखले
पुणे : क्रिकेट, बॉलिवूड आपल्या देशातील कला-क्रीडेचे सांस्कृतिक अधिष्ठान आहे. मात्र, राजकारण हा जिव्हाळ्याचा आणि आपल्या जीवनाशी संबंधित विषय आहे. त्यामुळे क्रिकेट व बॉलिवूडपेक्षा देशातील समस्या व राजकारणावर अधिक चिंतन व्हायला हवे, असे मत ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी व्यक्त केले.
माईर्स एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीने आयोजित पाचव्या छात्र संसदेतील ‘चित्रपट आणि क्रिकेट क्षेत्रापेक्षा राजकारणाला प्राधान्य’ या विषयावर ते बोलत होते. या वेळी हिमाचल प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष ब्रिज बिहारीलाल बुटैल व लेखक व क्रीडा समालोचक विक्रम साठ्ये उपस्थित होते. आमदार जितू पटवारी, सी. एन. अश्वथनारायण यांना आदर्श आमदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
गोखले म्हणाले, देशाला आज जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, सरदार पटेल यांच्यासारख्या दूरदृष्टी असलेल्या नेत्यांची गरज आहे. आजच्या तरुण पिढीमध्ये ही क्षमता आहे. त्यामुळे आतापर्यंतची राजकारणाची प्रतिमा विसरून नवी आदर्श प्रतिमा तयार करणे युवा वर्गाच्या हातात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाबासाहेब
आंबेडकर यांनी एकत्रित काम केले असते तर आजच्या राजकारणाचे चित्र वेगळे असते, असे गोखले यांनी नमूद केले.
राजकारण हा भ्रष्टाचाराचा किंवा वाईटांचा अड्डा समजून त्याकडे पाठ फिरवण्यापेक्षा त्यामध्ये सक्रिय सहभागी व्हावे, असे बुटैल म्हणाले. क्रिकेट आणि चित्रपटांसाठी आवश्यक असलेल्या गोष्टी सरकारकडून पर्यायाने राजकारणातून येतात. त्यामुळे तीनही क्षेत्रांचा मेळ घालायला हवा, असे साठ्ये यांनी सांगितले.(प्रतिनिधी)