अल्पवयीन मुलांच्या धाडसामुळे चोरटे पसार
By Admin | Updated: September 8, 2016 01:43 IST2016-09-08T01:43:33+5:302016-09-08T01:43:33+5:30
रात्री दीड वाजण्याची वेळ, सर्वत्र शांतता, फक्त कुत्री भुंकण्याचा आवाज, वस्तीवरील पंडित अंकुश वाळके यांच्या घरात पत्नी व दोन मुले आणि दारात चार चोरटे उभे राहिले.

अल्पवयीन मुलांच्या धाडसामुळे चोरटे पसार
लोणीकंद : रात्री दीड वाजण्याची वेळ, सर्वत्र शांतता, फक्त कुत्री भुंकण्याचा आवाज, वस्तीवरील पंडित अंकुश वाळके यांच्या घरात पत्नी व दोन मुले आणि दारात चार चोरटे उभे राहिले. वाळके यांनी अर्धा तास झुंज दिली. दरोडेखोरांनी दारावर मोठमोठे दगड टाकले. कटावणीने उखडण्याचा प्रयत्न केला. पिस्तूल रोखले, पण ते मागे हटले नाहीत. वाळके यांनी कडवी झुंज दिली.
अशीच झुंज सत्येन राजेंद्र चमरे (इ. १० वी) यानेही त्याच्याही घरासमोर भर रात्री पाच दरोडेखोर येऊन धडका देऊ लागले. सत्येन व त्याची आई सुनीता यांनी दरवाजा रोखून धरला.
दरवाजावर दरोडेखोरांनी सुमारे १५ किलो वजनाचा दगड मारला. यामुळे बिजागरी तुटून दरवाजा निसटला. त्या सापटीतून सत्येन याने मिरचीपूड फेकली. प्रचंड शक्तिनिशी लढा दिला. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर चोरटे पळून गेले.
पेरणे (ता. हवेली) अंगावर काटा उभा राहील, असा हा प्रसंग आहे. प्रथम रात्री दीड वाजण्याच्या सुमारास श्रीमती सुनीता राजेंद्र चमरे यांच्या घरावर चोर चालून आले. शुभम व सत्येन ही मुले त्यांच्यासमवेत होती.
या प्रकारानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा खडकवस्ती येथील वाळके यांच्या घराकडे वळविला. फाटक उघडताच ते जागे झाले. घराला जुना सागवानी दरवाजा होता. घरात पत्नी व दोन मुले होती. सर्वांना जागे करून प्रतिकार करण्याचे ठरवले. पंडित यांनी दरवाजा रोखून धरला, तर मुलांनी आरडाओरडा सुरू केला.
चोरटे दरवाजावर दगड मारत होते. दरवाजा उघडला नाही तरी पिस्तूलमधून गोळ्या घालू म्हणत होते. वाळके डगमगले नाहीत, अर्धा तास त्यांनी दरवाजा रोखून धरला.