गोदामामधील मालाची चोरी करून विक्री करणाऱ्या चोरटा ८ वर्षांनी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:15 IST2021-08-24T04:15:21+5:302021-08-24T04:15:21+5:30
पुणे : कोंढवा परिसरातील पत्रा, वायर, तेलाच्या गोदामामधील मालाची चोरी करून विक्री करणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या ...

गोदामामधील मालाची चोरी करून विक्री करणाऱ्या चोरटा ८ वर्षांनी जेरबंद
पुणे : कोंढवा परिसरातील पत्रा, वायर, तेलाच्या गोदामामधील मालाची चोरी करून विक्री करणाऱ्या चोरट्यास गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकाने अटक केली आहे.
दयानंद झा (वय ४२, रा. चिखली, मूळ रा. बिहार) असे अटक केलेल्या या चोरट्याचे नाव आहे. झा हा सराईत चोरटा असून त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात ८ गुन्हे दाखल आहेत. गेल्या ८ वर्षांपसून तो फरार होता.
कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विविध वस्तूंची गोदामे आहेत. झा याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने या परिसरातील गोदामामध्ये चोरी करून त्यातील पत्रा, वायर, तेलाचे डबे अशा वस्तू चोरी करून चिखली येथील भंगार व्यावसायिकांना विकत असे. त्याच्याविरुद्ध कोंढवा पोलीस ठाण्यात २०१३ मध्ये तब्बल गोदाम फोडीचे गुन्हे दाखल होते. तो मूळ गावी पळून गेला होता.
गुन्हे शाखेच्या युनिट ४ च्या पथकातील पोलीस हवालदार राजस शेख यांना झा हा पुण्यात पुन्हा आला असल्याची माहिती मिळाली. त्यावरून पोलीस पथकाने चिखली परिसरात शोध घेतला असता तो पिंपळे सौदागर येथील अगरवाल पॅकर्स ॲन्ड मुव्हर्स येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला पकडले.
पोलीस निरीक्षक जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शोभा क्षीरसागर, पोलीस अंमलदार दीपक भुजबळ, प्रवीण भालचिम, प्रवीण कराळे, शीतल शिंदे, महेंद्र पवार, स्वप्निल कांबळे यांनी ही कामगिरी केली.