These fascinate threads of love .. "tea" without incomplete ..! | ये मोह मोह के धागे.. " चाय " बिना अधुरे..! 
ये मोह मोह के धागे.. " चाय " बिना अधुरे..! 

- दीपक अविनाश कुलकर्णी 
अगदी नकळत्या वयापासून प्रेमात पडण्याची सवय जर कुणी लावली असेल तर ती या चहा महाशयांनी.. आपण सारे कधी त्यांचे दिवाना होतो हे निश्चित सांगणे तसे सगळ्यांनाच अवघडच.. पण आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यांवर मात्र तुमच्या आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक होत जातो हे तितकेच खरे...कधी रोजच्या धावपळीच्या जगण्यात कंटाळा, डोकंदुःखी , टेन्शन, डिप्रेशन यांचं इनकमिंग झालं असं वाटलं की स्वस्तात मस्त आणि सकारात्मक एनर्जी देण्याचं काम जर कोण करतं म्हणाल तर तो हा चहा.. प्रवासात असताना, कामानिमित्त किंवा अगदी सहजपणे होणाऱ्या गाठीभेटीच्या मैफली रटाळ न होता उत्तरोत्तर रंगतदार करण्याचं कामसुद्धा कुणामुळे शक्य होत असेल तर ते या ' राजा'मुळे.. कित्येक वर्ष तो माणसांच्या 'पेय ' (म्हणजे सर्वसामान्य आणि निर्व्यसनी माणसाला परवडेल असं) जगताचा अनभिषिक्त सम्राट म्हणून डौलाने मिरवतोय...हा मोठेपणा काय चहाला उगीच मिळालेला नाही..कुठल्याही सुख किंवा दुःखाच्या प्रसंगी आदरतिथ्याचं एक भाग म्हणून  चहाचा सहजपणे स्वीकार केला जातो..


 शाळा, कॉलेज, पुढचे शिक्षण , नोकरी अशा ठिकाणच्या बऱ्याच लव्हस्टोरीज  जुळण्यापाठीमागे चहाने नक्कीच मोलाची कामगिरी बजावलेली आहे.. अगदी पहिल्यांदा प्रेमाच्या दुनियादारीत प्रवेश करताना जोडप्यांना चहाला येतेस का..? असं नि:संकोचपणे म्हणता येऊ शकते..इथे थोडा तरी संयम आणि प्रामाणिकपणा मुलामधला झळकतो..  मात्र थेट कॉफीचं आमंत्रण हे फ्लर्ट करण्याचं लक्षण म्हणून नाकारले जाऊ शकते... माणूस म्हणून झालेल्या चुका समजून घेण्याच्या वेळेला देखील "या"  महाराजांचा खूप मोठा आधार मिळतो..चहा घेण्याअगोदर समोरच्याची तापलेली आणि बेफाम गाडी चहानंतर बऱ्यापैकी रुळावर आलेली असते.. (निरीक्षणातून)थंडी आणि पावसाळ्यात तर चहा महाराजांची डिमांड घराघरांसह चौफेर इतकी " हाय " होते की विचारता सोय नाही..फार कशाला एसटी स्टँड, रेल्वे स्टेशन, विमान, तसेच साधी टपरी ते ग्रँड हॉटेल यासर्व ठिकाणी अगदी सहजपणे उपलब्ध होणारे हे महाराज तसे कडकनाथच बरे..आलं, सुंठ, वेलची यांनी युक्त अशा वाफाळलेल्या चहाचा एक घोट घेतल्यावर मिळणारा  एक जबरदस्त जर्क तुफान एनर्जी देऊन जातो..अमृततुल्यची ही चव तृप्ततेची दिव्यअनुभूती दिल्याशिवाय राहत नाही..
चहा महाशयांचं एक कमालीचं आणि दुर्मिळ वैशिष्ट्य म्हणजे गरीब श्रीमंतीची दरी ज्या सहजतेने ' ते '  मिटवतात ना त्याचं फार मनाला अप्रूप वाटून जातं..ज्या नाजूक पद्धतीने ते त्यांच्यात खारी, बिस्किटे, पाव , ब्रेड यांना सहजपणे आपलंसं करून घेतात तो क्षण म्हणजे महान तत्त्ववेत्त्याचं क्षमाशील दर्शनच.. तो भावणारा क्षण न्याहाळताना वाटतं प्रत्येक माणसाने जर त्याच्या आयुष्यात येणारे सर्व दुःखं इतक्याच सहजपणे स्वीकारले तर सुख समाधान चहा इतकेच स्वस्त होतील..

आज काल मात्र चहाला आरोग्याच्या बाबतीत जागरूक होताना "गैर " ठरवले जात आहे..पण तो जर प्रमाणात घेतला तर त्याला जो 'अमृततुल्य' म्हणून बहुमान पुण्याने दिला आहे तो खोटा ठरणार नाही याची जाम खात्री आहे..आणि असेही नाही की चहा पिणे बंद केल्यावर तुम्हाला काही आजर होणार नाही याची पूर्णपणे खात्री असते..पण तसेही  आरोग्यावर दुष्परिणाम करणाऱ्या सगळ्याच गोष्टी कुठं आपण अगदी हातासरशी सोडून देतो.. प्रमाणात घेतली तर कुठलीच गोष्ट आरोग्याला बाधा पोहचवत नाही..कुठल्याही गोष्टीचं व्यसन हे घातक असतं.. कधी कधी चहा मात्र ब्रेक अप इतकंच निराश देखील करून जातो.. ते पण अगदी महागड्या हॉटेलमध्ये भरमसाठ पैसे खर्च करून देखील...तर मुसळधार पावसात कधी घाटातल्या एखाद्या टिपकणाऱ्या टपरीतल्या चूल, स्टोवरचा चहा आपली चव जपतो.. आलं , वेलची, याचा दरवळणारा सुगंध आला की ज्या कुणी चहाला "अमृततुल्य" ही उपमा दिली ती त्याचा चरणस्पर्श करावासा वाटतो.. 'चहा'वर प्रेम करणारी माणसं कमी नाही होणार.. कारण त्याने सुख दुःख जपलं आहे...आजकाल तर फक्त चहावर दुकान थाटून लाखो रुपये  कमावणारे व्यावसायिक पाहायला मिळतात... 

जर आपण शहर सोडून दुर्गमातल्या दुर्गम भागात आणि गरीबातल्या गरीब झोपडीत जरी समजा पाऊल ठेवलं ना घरातील माऊली तात्काळ चहाचा कप हातात देते..त्या घरात कदाचित लाईट नसते पण चहा असतोच..भलेही तो करण्यासाठी गाय किंवा म्हशीचे दूध विकत आणणे शक्य नसेल तेव्हा तो शेळीच्या दुधाचा केला जातो.आणि समजा ते ही शक्य नसेल तर अगदी चहा साखर किंवा मग गुळाचा उकळून केलेला फक्कड असा "कोरा " चहा तर हमखास पाहुण्यांच्या हातात ठेवला जातो...यातली गंमत म्हणजे गरीबाच्या झोपडीतला किंवा वाड्या वस्त्यांवरचा "कोरा चहा" जो आज उंचे लोगो की उंची पसंद म्हणून शहरात आणि मोठ्या मोठ्या मीटिंग समारंभामध्ये" ब्लॅक टी" म्हणून फुशारकी मारत मिरवत असतो.. एक मात्र शंभर टक्के खरं.. मघाशी म्हटलं तसं गरीब श्रीमंत असा भेदभावच हा "चहा" नावाचा "राजामाणूस " ठेवत नाही..! 
 

Web Title: These fascinate threads of love .. "tea" without incomplete ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.