..म्हणून नाटय़ संमेलनाचा ‘तमाशा’
By Admin | Updated: December 13, 2014 01:57 IST2014-12-13T01:57:47+5:302014-12-13T01:57:47+5:30
मोहन जोशी यांच्या वक्तव्याच्या पाश्र्वभूमीवर अखिल भारतीय नाटय़ संमेलन आयोजित करण्यास असमर्थ आहोत,

..म्हणून नाटय़ संमेलनाचा ‘तमाशा’
एकीकरण समितीचा दबाव : बेळगाव नाटय़ परिषद अध्यक्ष वीणा लोकूर यांचा गौप्यस्फोट
पुणो : मोहन जोशी यांच्या वक्तव्याच्या पाश्र्वभूमीवर अखिल भारतीय नाटय़ संमेलन आयोजित करण्यास असमर्थ आहोत, असे सांगण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने आमच्यावर दबाव टाकला, असा गौप्यस्फोट अखिल भारतीय नाटय़ परिषदेच्या बेळगाव शाखेच्या अध्यक्ष वीणा लोकूर यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.
बेळगावमध्ये नाटय़ संमेलन घेण्याचे आम्ही किमान धाडस तरी दाखविले; मात्र बेळगाव महापालिकेमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने मराठी ङोंडा फडकावला. मग गेल्या दोन वर्षात बेळगाव सीमाप्रश्नावर का नाही ठराव संमत केला गेला, असा सवाल लोकूर यांनी केला.
संमेलनातील व्यासपीठावर सीमाप्रश्नासंबंधी कोणतेही विधान केले जाणार नाही, आमचा त्यांच्याशी काही संबंध नाही, असे वक्तव्य मोहन जोशी यांनी केले होते. याचा महाराष्ट्र एकीकरण समितीने निषेध व्यक्त करून मोर्चा काढला होता. या पाश्र्वभूमीवर बेळगाव नाटय़ परिषदेच्या भूमिकेबद्दल लोकूर यांच्याशी संवाद साधण्यात आला.
बेळगावमध्ये एकंदर तापलेले वातावरण पहाता याठिकाणी नाटय़ संमेलन आयोजित करण्याचे आम्ही धाडस दाखविले. बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, ही सर्वाचीच मागणी आहे. पण सध्या तरी बेळगाव हे कर्नाटकात आहे, असे सांगून त्या म्हणाल्या, संमेलनाच्या आयोजनासाठी मंडप उभारण्यापासून विविध गोष्टींच्या परवान्यांची आवश्यकता असते. त्यासाठी प्रशासनाचे सहकार्य घेण्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्र एकीकरण समितीची मदत घेतली असती तर अनेक अडचणींचा सामना करण्याची वेळ आमच्यावर आली असती. निधी उभा कसा करणार? हा यक्षप्रश्न आमच्यासमोर आहेच. इतक्या वर्षात समितीने बेळगावात संमेलन का नाही आयोजित केले? किंवा महापालिकेमध्ये बेळगाव सीमा प्रश्नावर ठराव संमत केला, असा सवालही लोकूर यांनी केला.
नाटय़ परिषदेच्या पदाधिका:यांची बेळगावात बैठक सुरू आहे, निर्णय अद्याप झालेला नाही. रविवारी नियामक मंडळाची बैठक होणार असून, त्यामध्ये चर्चा होईल.
आता संमेलन केले किंवा नाही केले तरी आमच्यावर दडपण असणारच आहे. संमेलन आयोजित केले म्हणून समितीचा दबाव आणि नाही केले तर मराठी जनतेचा दोष, असे दोन्हीकडून आमचीच गळचेपी होणार आहे.
- वीणा लोकूर