‘राष्ट्रवादावर’ प्रहार करावेच लागतील
By Admin | Updated: January 30, 2017 03:06 IST2017-01-30T03:06:11+5:302017-01-30T03:06:11+5:30
राष्ट्र व लोकशाही हे दोन विरुद्ध ध्रुवांवरील विचार आहेत. लोकशाही उत्सव साजरे करायचे असतील, तर राष्ट्रवादावर प्रहार करावेच लागतील

‘राष्ट्रवादावर’ प्रहार करावेच लागतील
पुणे : राष्ट्र व लोकशाही हे दोन विरुद्ध ध्रुवांवरील विचार आहेत. लोकशाही उत्सव साजरे करायचे असतील, तर राष्ट्रवादावर प्रहार करावेच लागतील,’ असे परखड मत व्यक्त करीत ज्येष्ठ भाषातज्ज्ञ व विचारवंत डॉ. गणेश देवी यांनी ‘लोक ही प्राथमिक व राष्ट्र ही दुय्यम कल्पना मानायला हवी,’ असे टीकास्त्र सोडले.
लोकशाही उत्सव समितीतर्फे आयोजित लोकशाही उत्सवात ‘अभिव्यक्तिस्वातंत्र्याची ऐशीतैशी’ या विषयावर ते बोलत होते. सुनीती. सु. र., गणेश विसपुते उपस्थित होते. इतिहासाचे अभ्यासक प्रा. राजा दीक्षित अध्यक्षस्थानी होते.
इटली आणि फ्रान्स या देशांतून राष्ट्रवाद पुढे आला असून, त्यातून हुकूमशाहीच निर्माण झाल्याचे दिसते. जगात अनेक ठिकाणी स्वातंत्र्य, हक्कांचे दमन सुरू झाल्याने हुकूमशाही पुढे येत आहे. जगभर हुकूमशाहीचे वातावरण असताना लोकशाहीसाठी सत्ताकेंद्राच्या परिघाबाहेर किंवा सत्ता त्रिज्यांवर काम करावे लागणार आहे. कारण असेपर्यंत व्यक्तीचा तिरस्कार योग्य आहे; पण त्यापेक्षा घटनात्मक कामाकडे वळालेले बरे, अशा कानपिचक्या डॉ. देवी यांनी दिल्या.
‘हुकूमशाहीत नेहमीच इतिहासाची गळचेपी होते. इतिहास हा हुकूमशाहीचे भक्ष्य व त्यावरील जालीम उपाय, असे दोन्ही आहे. संकटग्रस्त काळ असल्याने इतिहासाला साचलेपण आले आहे. सर्वपक्षीय हुकूमशाहीच्या युगात आपण वावरत असून, इतिहासाचा पाया खिळखिला झाला आहे,’ असे टीकास्त्र प्रा. दीक्षित यांनी सोडले.