अस्ताव्यस्त वाढलेल्या पुणे जिल्ह्यात प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हिंजवडी, चाकण हे आयटी आणि ऑटो हब यामुळे त्रस्त झालेले आहेत. येथील अनधिकृत बांधकामे, वाहतुकीचा उडालेला बोजवारा यासाठी तेथील ग्राम पंचायती एवढ्या सक्षम नाहीत. यामुळे पुणे जिल्ह्यात तीन नव्या महापालिका होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.
कोणाला आवडेल किंवा नाही, तरीही मी करणार असल्याचा इशारा अजित पवारांनी या तीन महापालिका करण्यावर दिला आहे. तसेच चाकण आणि परिसरात एक महापालिका, हिंजवडी भागात एक महापालिका आणि मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागाची एक महापालिका करणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले. अजित पवार हे चाकण भागातील वाहतूक कोंडीची पाहणी करण्यासाठी आले होते. पहाटे ५.४५ ला ते चाकणला पोहोचले होते. तळेगाव ते शिक्रापूर मार्ग सहा पदरी करणार असल्याचे ते म्हणाले. पुणे-नाशिक हा एलिव्हेटेड मार्ग करू, तुमची त्रासातून मुक्तता करुया, असे पवार म्हणाले. चाकण एमआयडीसीमध्ये 1500 छोट्या-मोठ्या कंपन्या आहेत, त्यात साडे तीन लाख कर्मचारी काम करतात. त्यामुळं या परिसरात रोज लाखभर वाहने ये-जा करतात. त्यांची कोंडी फोडावी लागणार असल्याचे अजित पवार म्हणाले.