आंबेगावमध्ये चौरंगी लढत होणार
By Admin | Updated: February 14, 2017 01:46 IST2017-02-14T01:46:20+5:302017-02-14T01:46:20+5:30
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माघारीनंतर आंबेगाव तालुक्यात चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रस

आंबेगावमध्ये चौरंगी लढत होणार
मंचर : जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या माघारीनंतर आंबेगाव तालुक्यात चौरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रस यांच्यात सरळ लढत होत असली, तरी भाजपा व काँग्रेसने उमेदवार उभे करून चुरस निर्माण केली आहे. मंचर गणात झालेली बंडखोरी रोखण्यात शिवसेनेला यश आले नाही. येथे जिल्हा सल्लागार राजाराम बाणखेले व बजरंग दलाचे तालुकाध्यक्ष सुहास बाणखेले यांनी माघार घेतली नसल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. या गणात ६ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे.
जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी आज माघारीचा शेवटचा दिवस होता. जिल्हा परिषदेच्या ५ जागांमधून २९ उमेदवारांपैकी ५ जणांनी माघार घेतल्याने २४ उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहे. पंचायत समितीच्या १० जागांतील ६४ उमेदवारांपैकी २४ जणांनी माघार घेतल्याने ४० उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले. माघारीनंतर चौरंगी लढत बहुतेक ठिकाणी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजपा, काँग्रेस या पक्षात लढती रंगणार आहे. राष्ट्रवादी काँगे्रसने प्रत्येक जागेवर २ उमेदवार दिले होते. त्यातील प्रत्येकी एकाने माघार घेतल्याने राष्ट्रवादी काँगे्रस पक्षात कोठेही बंडखोरी झाली नसल्याचे दिसून येते. भाजपाने पंचायत समितीच्या दोन जागा आरपीआयसाठी सोडल्या आहेत. काँगे्रस पक्षाला ४ पंचायत समिती गणात त्यांचे उमेदवार उभे करता आलेले नाहीत. घोडेगाव, पेठ, रांजणी, पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक या गणात काँग्रेसचे उमेदवार नाहीत. जिल्हा परिषदेच्या ५ व पंचायत समितीच्या ६ जागांवर उमेदवार उभे असून माघारीच्या दिवशी काँगे्रसचे तालुकाध्यक्ष राजू इनामदार सर्व उमेदवारांना सोबत घेऊन अज्ञात स्थळी थांबले होते.
विशेषत: खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी सुहास बाणखेले यांनी माघार घ्यावी, यासाठी प्रयत्न केले होते. माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत बाणखेले माघार घेतील, असा विश्वास काही शिवसैनिकांना वाटत होता. मात्र, याबाबतची चर्चा रात्रीच थांबली होती. राजाराम बाणखेले यांनी माघार घ्यावी, यासाठी शिवसेनेकडून फारसे प्रयत्न झालेले दिसले नाहीत.
मंचर गणात काय झाले, याची उत्सुकता एवढी होती, की दुपारी ३ पर्यंत भ्रमणध्वनीवर चौकशी केली जात होती. आता चित्र स्पष्ट झाले आहे. प्रमुख पक्षांसोबत २ अपक्ष उमेदवार असे ६ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे येथील लढत रंगतदार झाली आहे.
अपक्ष उमेदवारांना आज निवडणूक चिन्ह देण्यात आल्याने त्यांचा प्रचार खऱ्या अर्थाने आज सुरू होणार आहे. आंबेगाव तालुक्यात मंचर गणातील बंडखोरीमुळे माघारीबाबत उत्सुकता होती. (वार्ताहर)