पोलीस संरक्षणात बांधकामे पडणार
By Admin | Updated: March 15, 2015 00:42 IST2015-03-15T00:42:47+5:302015-03-15T00:42:47+5:30
अनधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले.

पोलीस संरक्षणात बांधकामे पडणार
पिंपरी : अनधिकृत बांधकामावरील कारवाईसाठी स्वतंत्र यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले. त्यानुसार शासनाची मंजुरी घेऊन महापालिकेने अभियंते, तसेच अन्य कर्मचारी वर्ग यांची भरती प्रक्रिया हाती घेतली आहे. त्यातच आता या कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना देण्यात आले आहेत. महापालिकेनेही लवकरच कारवाईची मोहीम हाती घेण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र सादर केले असल्याने १ एप्रिलपासून कारवाईला वेग द्यावा लागणार आहे.
राज्यातील अनधिकृत बांधकामे नियमितीकरणाबाबत तोडगा काढण्यासंबंधी स्थापन केलेल्या कुंटे समितीचा अहवाल शासनास सादर झाला आहे. त्यावर शासनाकडून पुढील निर्णय जाहीर झालेला नाही. पिंपरी-चिंचवडमधील अनधिकृत बांधकामप्रकरणी दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या निकालामुळे या भागातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे महापालिकेला भाग पडू लागले आहे.
ही कारवाई धिम्या गतीने सुरू आहे. कधी कर्मचारी संख्या अपुरी असल्याने मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याचे, तर कधी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण महापालिकेने पुढे केले होते. त्यावर उपाय म्हणून महापालिकेला अवैध बांधकामावरील कारवाईसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग नेमण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. स्वतंत्र कर्मचारी वर्ग नियुक्तीस शासनाची मंजुरी मिळविण्यापासून ते प्रत्यक्ष भरती प्रक्रियेपर्यंत महापालिकेला वेळ मिळाली. त्यामुळे कारवाईत चालढकल सुरू होती.
१३ मार्चला अवैध बांधकामाविरुद्धच्या कारवाईसाठी पोलीस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, असे आदेश थेट पोलीस आयुक्तांना न्यायालयाने दिले. पोलीस बंदोबस्त उपलब्ध करून देण्याच्या हालचाली यंत्रणेत सुरू झाल्या आहेत. बंदोबस्त मिळाल्यानंतर पालिकेला चालढकल करता येणार नाही. त्यामुळे अनधिकृत बांधकामाविरुद्धची कारवाई अधिक तीव्र होणार आहे. (प्रतिनिधी)
४अनधिकृत बांधकामाविरुद्धच्या कारवाईसाठी स्वतंत्र कर्मचारी वर्ग उपलब्ध करून दिला जाणार आहे. महापालिकेने कनिष्ठ अभियंते, उपअभियंते, तसेच सर्व्हेअर अशा विविध पदांसाठी अर्ज मागविले आहेत. सुमारे २१ हजार अर्ज आले असून, २९ मार्चला या पदांसाठी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. महापालिकेची एकीकडे भरती प्रक्रियेची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे पोलीस बंदोबस्त उपलब्ध होणार असल्याने कारवाईसाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यासाठी तारांबळ उडाली आहे.