मेट्रोसाठी पर्यायी रस्ते होणार मोठे
By Admin | Updated: March 14, 2017 07:55 IST2017-03-14T07:55:18+5:302017-03-14T07:55:18+5:30
पुण्यातील मेट्रो रस्त्याच्या मध्यभागातून जाणार असल्याने काम सुरू असताना दोन्ही बाजूंना अरुंद जागा राहणार आहे.

मेट्रोसाठी पर्यायी रस्ते होणार मोठे
पुणे : पुण्यातील मेट्रो रस्त्याच्या मध्यभागातून जाणार असल्याने काम सुरू असताना दोन्ही बाजूंना अरुंद जागा राहणार आहे. येथे होणारी प्रचंड वाहतूककोंडी लक्षात घेऊन पर्यायी रस्ते मोठे करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पदपथांचा वापर करण्याचाही पर्याय असून यासाठी खास आराखड बनविला जात आहे.
नागपूर मेट्रोच्या तुलनेत पुणे मेट्रोच्या कामाने अद्याप वेग घेतलेला नाही. याचे कारण म्हणजे नागपूरमध्ये मोठे रस्ते, सरकारी मालकीच्या मुबलक जमिनीची उपलब्धता आहे. या तुलनेत पुण्यातील अगोदरच अरुंद रस्त्याच्या मध्यभागात अनेक महिने मेट्रोचे काम सुरू राहणार आहे. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी होऊ शकते. शिवाजीनगर ते स्वारगेट हा मार्ग भुयारी आहे. त्याचे काम सुरू असताना, तर वाहतुकीचा प्रचंड गोंधळ होणार आहे. तो नियंत्रणात आणण्यासाठी व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित अधिकाऱ्यांना आराखडा बनविण्यास सांगितले आहे.
नागपूर मेट्रोचे काम पाहत असलेले अधिकारी पुण्याचे काम जास्त गतीने होणार, असे सांगतात. पुणे मेट्रोच्या कामाच्या पहिल्या दीड किलोमीटरच्या टप्प्याची आता कुठे निविदा निघते आहे. कामाच्या प्रत्यक्ष जागेवर तर अजून काहीच नाही. नागपूरला मात्र जमिनीवरचा व पुलावरचा असा अडीच किलोमीटरचा मार्ग तयार आहे, दोन मोठे डेपोही तयार होत आले आहेत.
खासगी जागांची गरज ही पुण्यातील आणखी एक मोठी समस्या आहे. मेट्रो मार्गासाठी तसेच स्टेशन, डेपो यासाठी फार मोठी जागा लागणार आहे. नागपूरमध्ये मेट्रो कंपनीला अगदी सहजपणे ही जागा उपलब्ध झाली, कारण ती सरकारी मालकीची होती. त्यामुळे त्यांचा मुख्य स्थानक २४ एकरांवर, तर स्टेशनही अशीच सरकारी मालकीच्या जागेवर आहेत. खासगी मालकीची जागा घ्यायची असेल तर त्यासाठीची नुकसानभरपाई, ती कमी असणे, नंतर न्यायालयात वाद, त्यातून काम सुरू करण्यास विलंब असे बरेच कोही होण्याची दाट शक्यता आहे. नदीपात्रातून जाणाऱ्या मार्गाविषय हरकत घेण्यात आलीच आहे.
येत्या मार्चअखेरपर्यंतच पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची निविदा जाहीर होईल. त्यानंतर या कामाला गती येईल, असे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. नागपूरचे काम करताना आलेल्या अनुभवातून शहाणे होऊनच पुण्याचे काम करणार असल्याचे व त्यामुळेच ते काम गतीने होईल, असा विश्वास दीक्षित यांनी व्यक्त केला.
(प्रतिनिधी)