नदीपात्रातील रस्ता झालाच पाहिजे
By Admin | Updated: January 18, 2015 01:21 IST2015-01-18T01:21:17+5:302015-01-18T01:21:17+5:30
सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विठ्ठलवाडी ते वारजे या मार्गावर नदीपात्रात बांधण्यात येणाऱ्या रस्त्यास हरित लवादाने परवानगी नाकारली आहे.

नदीपात्रातील रस्ता झालाच पाहिजे
पुणे : सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी विठ्ठलवाडी ते वारजे या मार्गावर नदीपात्रात बांधण्यात येणाऱ्या रस्त्यास हरित लवादाने परवानगी नाकारली आहे. मात्र, हा रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वाचा असून, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने पालिकेने भूमिका मांडावी व रस्ता सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी पक्षाच्या वतीने शनिवारी हिंगणे चौकात धरणे आंदोलन केले. आमदार माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. स्थानिक नगरसेवक श्रीकांत जगताप यांच्यासह स्थानिक नागरिक या वेळी उपस्थित होते.
नदीपात्रातील रस्ता काढल्यास नदीकाठच्या सोसायट्यांमध्ये पाणी घुसणार आहे. न्यायालयाचा सन्मान राखून महापालिकेने योग्य तोडगा काढावा, तसेच सिंहगड रस्त्यास पर्यायी रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी या वेळी आंदोलकांकडून करण्यात आली. ही मागणी राज्य शासनाकडे करण्यासाठी आमदार मिसाळ आणि तापकीर यांना निवेदन देण्यात आले. याशिवाय सर्वोच्च न्यायालयात जाऊन महापालिकेने या निर्णयातून स्थानिक नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. (प्रतिनिधी)