पूर्व, पश्चिम भागासाठी २ महापालिका असाव्यात

By Admin | Updated: May 19, 2015 01:08 IST2015-05-19T01:08:14+5:302015-05-19T01:08:14+5:30

महापालिकेत २३ गावांचा समावेश झाल्यामुळे अगोदरच मूलभूत सुविधांवर ताण आहे.

There should be 2 municipal corporations for East, west part | पूर्व, पश्चिम भागासाठी २ महापालिका असाव्यात

पूर्व, पश्चिम भागासाठी २ महापालिका असाव्यात

पुणे : महापालिकेत २३ गावांचा समावेश झाल्यामुळे अगोदरच मूलभूत सुविधांवर ताण आहे. त्यामध्ये नवीन ३८ गावांचा समावेश करताना पूर्व भागासाठी हवेली-हडपसर आणि पश्चिम भागासाठी खडकवासला-पिरंगुट अशा दोन स्वतंत्र महापालिका करण्यात याव्यात. पुणे महापालिकेच्या विकेंद्रीकरणामुळे नियोजनबद्ध विकासाला गती मिळेल, असे मत बांधकाम व्यावसायिक व नगररचना तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

राज्य शासनाने हवेली-हडपसरसाठी स्वतंत्र महापालिका करण्याविषयी पुणे महापालिका प्रशासनाकडे अभिप्राय मागविला आहे. मात्र, स्वतंत्र महापालिका करण्यामागे शासनाचा राजकीय हेतू
असल्याने स्थानिक नगरसेवकांनी विरोध दर्शविला आहे. मात्र, पुणे महापालिकेचे अगोदरचे क्षेत्र सुमारे २५० चौरस किलोमीटर आहे. त्यामध्ये नवीन ३८ गावांचा समावेश झाल्यास हे क्षेत्र दुप्पट म्हणजे मुंबई महापालिकेपेक्षा अधिक होणार आहे. त्यामुळे
वाढीव क्षेत्रातील नागरिकांना मूलभूत सुविधा देण्यासाठी महापालिकेची यंत्रणा अपुरी पडणार आहे. परिणमत: विकासाचा वेग कमी होऊन असमतोल विकास होईल. त्यामुळे स्वतंत्र महापालिका हा पर्याय स्वागतार्ह असल्याचे नगररचना तज्ज्ञ व बांधकाम व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

महापालिका जेवढी छोटी तेवढा विकास गतीने होईल. मात्र, त्यासाठी आर्थिक पाठबळ व उत्पन्नाची शाश्वती असली पाहिजे. नव्या ३८ गावांचा समावेश महापालिकेत करण्याऐवजी ‘पीएमआरडीए’मध्ये करावी.
- शांतिलाल कटारिया, अध्यक्ष, मेट्रो, पुणे
नव्या महापालिकेचा निर्णय स्वागतार्ह आहे. परंतु, त्यासाठी आर्थिक अनुदान व उत्पन्नाचे स्रोत आवश्यक आहे. पुणे परिसराचा विकास व विस्तार होत असताना विद्यमान ग्रामपंचायती मूलभूत सुविधा पुरवू शकत नसल्याची वस्तुस्थिती आहे.
- संदीप सातव,
व्यवस्थापकीय संचालक, व्यंकटेश आॅक्सी ग्रुप
पिंपरी-चिंचवड महापालिका स्वतंत्र केल्याने वेगाने विकास झाला. महापालिकेचे क्षेत्र मर्यादित असेल, तर नियोजन व अंमलबजावणी प्रभावीपणे करता येईल. गावांचा समावेश करतानाच नवीन महापालिका होणे आवश्यक आहे.
- सागर भंडारी, संचालक, भंडारी असोसिएट्स

पुणे महापालिकेच्या मूलभूत सुविधांवर ताण आहे. त्यामुळे नवीन गावांचा समावेश करताना पुण्याच्या चारही दिशेला महापालिकेऐवजी चार नगरपालिका कराव्यात. त्यांच्या विस्तार झाल्यानंतर आपोआप महापालिका होतील.
- बापूसाहेब दिघे, बांधकाम व्यावसायिक
पुणे महापालिकेत ३८ गावांचा समावेश करताना पूर्व व उत्तर भागासाठी आणि पश्चिम व दक्षिण भागासाठी अशा स्वतंत्र दोन महापालिका कराव्यात. त्यामुळे शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यास वाव मिळेल.
- रामचंद्र गोहाड, नगररचना तज्ज्ञ
पुणे महापालिकेचा विस्तार करताना चार भागांत चार झोन निर्माण
करावेत. प्रत्येक झोनला स्वतंत्र नगरअभियंता आणि इंजिनिअर देण्यात यावेत. अधिकारांचे विकेंद्रीकरण केल्यास वेगळ््या महापालिकेची गरज भासणार नाही.
- विनय खांडेकर, अर्बन व रिजनल प्लॅनर

Web Title: There should be 2 municipal corporations for East, west part

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.