ऊसशेतीला धरणाचे पाणी नाही?
By Admin | Updated: September 21, 2015 03:50 IST2015-09-21T03:50:36+5:302015-09-21T03:50:36+5:30
धरणातील पाणी ऊस पिकास देऊ नये, अशी जलतज्ज्ञांनी शिफारस केली आहे. त्यावर शासन गांभीर्याने विचार करीत असल्याने आगामी काळात उसाला

ऊसशेतीला धरणाचे पाणी नाही?
इंदापूर : धरणातील पाणी ऊस पिकास देऊ नये, अशी जलतज्ज्ञांनी शिफारस केली आहे. त्यावर शासन गांभीर्याने विचार करीत असल्याने आगामी काळात उसाला धरणातून पाणी मिळण्याची शक्यता धूसर झाल्याचे संकेत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिले.
कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या ३० व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरातील महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात ही सभा झाली.
साखर कारखान्यांच्या चालू गळीत हंगामासंदर्भात मंत्री समितीची बैठक अद्याप झाली नाही. बैठक झाल्याशिवाय कारखाना सुरू करता येत नाही. जर सरकारच्या परवानगी शिवाय कारखाना सुरू केला तर सरकार एका दिवसाला ५ लाख रुपये दंड करणार आहे. त्यामुळे कारखानदारांपुढे समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, सभासदांनी काळजी करण्याचे कारण नाही. कोणत्याही परिस्थितीत कारखाना आपण सुरूच करणार आहोत, असे पाटील म्हणाले.
२०१५-१६ च्या गळीत हंगामाला शासनाने त्वरित परवानगी द्यावी. याबाबत ठराव या वेळी मंजूर करण्यात आला. तसेच ऊस गाळपासाठी कारखान्याला पाणी उचलण्याची परवानगी शासनाने द्यावी, असा ठरावही मंजूर करण्यात आला. सभेस सर्व संचालक, ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते. कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्मा भोसले यांनी प्रास्ताविक केले.