खासगी शाळांतही गणवेश नाहीच
By Admin | Updated: July 3, 2016 04:07 IST2016-07-03T04:07:48+5:302016-07-03T04:07:48+5:30
पालकांनी ठराविक दुकानातूनच विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करावी, अशी सक्ती खासगी शाळांकडून केली जाते, मात्र शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटून गेले तरीही दुकानामध्ये बदललेला गणवेशच

खासगी शाळांतही गणवेश नाहीच
पुणे : पालकांनी ठराविक दुकानातूनच विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करावी, अशी सक्ती खासगी शाळांकडून केली जाते, मात्र शाळा सुरू होऊन १५ दिवस उलटून गेले तरीही दुकानामध्ये बदललेला गणवेशच मिळत नसल्याने विद्यार्थ्यांना घरचे कपडे घालून शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे पालिकेच्या शाळांमधीलच नाही, तर खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांवरही जुन्याच गणवेशात शाळेत जाण्याची वेळ आली आहे.
शाळा सुरू होण्यापूर्वीच पालक आपल्या मुला-मुलींसाठी नवीन गणवेश, स्कूलबॅग, वॉटरबॅग आदी शैक्षणिक साहित्य खरेदी करतात. काही शाळांकडून गणवेश, पुस्तके शाळेतूनच खरेदी करण्याची सक्ती केली जाते. त्यासाठी मनमानी पद्धतीने शुल्कही आकारले जाते. गणवेश बदलला जाणार असल्यास त्याबाबत पालकांना कल्पना दिली जाते. काही शाळांकडून दरवर्षी गणवेश बदलला जातो. परिणामी पालकांवर दरवर्षी नवीन गणवेश खरेदीचा भार पडतो. बदललेला गणवेश ठराविक दुकानातून खरेदी करण्याबाबत सूचना दिली जाते. त्यानुसार पालक गणवेश खरेदी करतात.
येरवडा येथील हाऊसिंग बोर्ड परिसरातील एका शाळेने इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचा गणवेश बदलला. गणवेश विक्री करणाऱ्या दुकानदारांना गणवेश बदलाबाबतची कल्पना दिली. बदललेल्या गणवेशाचे सॅम्पल शाळेत लावण्यात आले होते. पालकांनी १० जूनपासून ठराविक दुकानातून गणवेश खरेदी केली होती. मात्र, अचानक दुकानातील गणवेश विक्री थांबविण्यात आली.
(प्रतिनिधी)
एका वर्गात दोन रंगांचे गणवेश
दुकानातून विकल्या जाणाऱ्या शर्टचा रंग फिकट असल्याने ही विक्री थांबविली जात असल्याचे बोलले जात आहे. परिणामी विद्यार्थ्यांना गेल्या वर्षीचे जुने गणवेश घालूनच शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे एकाच वर्गात दोन वेगवेगळ्या गणवेशातील विद्यार्थी दिसून येत आहेत. येरवडा येथील शाळेत नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकडे जुना आणि नवीन गणवेश नसल्याने त्यांना घरचे कपडे घालून यावे लागत आहे.
पालिकेच्या शाळेतील सुमारे १५ हजार विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आले आहेत. उर्वरित विद्यार्थ्यांना आणखी काही दिवस गणवेशासाठी वाट पाहावी लागेल. तसेच येरवडा येथील दुकानात गणवेश विक्री केली जात नसल्यामुळे काही खासगी शाळेतील विद्यार्थ्याना नवीन गणवेशासाठी २० जुलैपर्यंत जुना गणवेश घालून शाळेत जावे लागणार आहे. त्यातही बदललेला गणवेश विकत घेणाऱ्या पालकांना बदलून दिला जाणार का? याबाबतही पालकांमध्ये संभ्रम आहे.