विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सरसकट कपात नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:12 IST2021-03-15T04:12:29+5:302021-03-15T04:12:29+5:30
पुणे : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रावर परिणाम झाला असून ऑनलाइन पध्दतीने शिक्षण सुरू असल्याने परीक्षेपूर्वी अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य ...

विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात सरसकट कपात नाही
पुणे : कोरोनामुळे शिक्षण क्षेत्रावर परिणाम झाला असून ऑनलाइन पध्दतीने शिक्षण सुरू असल्याने परीक्षेपूर्वी अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य न झाल्यास त्यात कपात केला जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. परंतु, अभ्यासक्रम पूर्ण करण्यास पुरेसा कालावधी मिळाल्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सरसकट सर्वच अभ्यासक्रमात कपात केली जाणार नाही, असे विद्यापीठाच्या अधिका-यांनी स्पष्ट केले आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमावली प्रसिध्द केली आहे. त्यात ऑनलाइन पध्दतीने वर्ग घेतले जात असल्यामुळे काही विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे शक्य झाले नाही. तर अभ्यासक्रम कमी करण्याबाबत विद्यापीठांनी निर्णय घ्यावा, असे सूचित केले आहे. त्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने सर्व विद्याशाखांच्या अधिष्ठात्यांना व अभ्यास मंडळाला अभ्यासक्रमात कपात करण्याचे अधिकार दिले. यंदा अभियांत्रिकी, फार्मसी व आर्केटेक्चरचे प्रवेश उशीर झाल्याने केवळ या अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राची परीक्षा ७० टक्के अभ्यासक्रमाच्या आधारे घ्याव्यात अशा सूचना दिल्या आहेत. उर्वरित सर्व विषयांची परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर घेतली जाणार आहे.
विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. पराग काळकर म्हणाले, बारावीचा निकाल वेळेत जाहीर झाल्याने पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशास विलंब झाला नाही. कला, वाणिज्य व विज्ञान शाखेची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली. मात्र, काही व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश उशीरा झाले. परंतु, या विषयांचा अभ्यासक्रम सुध्दा परीक्षेपूर्वी पूर्ण करून १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा घेतली जाईल.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एम.जी.चासकर म्हणाले, कोरोनामुळे अभियांत्रिकी,फार्मसी व आर्केटेक्चर अभ्यासक्रमाचे प्रवेश उशीर झाल्याने केवळ या अभ्यासक्रमाची पहिल्या सत्राची परीक्षा ७० टक्के अभ्यासक्रमावर घेतली जाईल.परंतु,दुस-या सत्राची परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमावर होईल. दुसरे सत्र पूर्ण करण्यासाठी तीन महिन्यांचा कालावधी मिळणार असल्याने अभ्यासक्रमात कपात करण्याची आवश्यकता भासणार नाही.
---
विद्यापीठाने अभ्यासक्रमात कपात करण्याचे अधिकार सर्व अधिष्ठात्यांना व अभ्यास मंडळांना दिले आहेत. मात्र, सरसकट सर अभ्यासक्रमात कपात होणार नाही. परंतु, आवश्यकता भासल्यास काही अभ्यासक्रमातील घटक कमी केले जाऊ शकतात.
-डॉ. एन. एस. उमराणी, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ