पुनर्वसन करताना राजकारण नको
By Admin | Updated: July 2, 2017 02:56 IST2017-07-02T02:56:53+5:302017-07-02T02:56:53+5:30
पुणे शहरातील एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोक झोपडपट्टीमध्ये राहात आहेत, त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविताना सर्वांनी

पुनर्वसन करताना राजकारण नको
लोकमत न्यूज नेटवर्क
उंड्री : पुणे शहरातील एकूण लोकसंख्येच्या ४० टक्के लोक झोपडपट्टीमध्ये राहात आहेत, त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प राबविताना सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवावे, असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले.
कोंढवा खुर्दमधील कमेला झोपडपट्टी पुनर्वसन योजना प्रकल्पाचे भूमिपूजन पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. झोपडपट्टी पुनर्वसन योजना राज्य सरकारने चालू करून १२ वर्षे झाली परंतु या कालावधीत केवळ १८ हजार झोपडीवासीयांना याचा लाभ झाला असल्याची खंत या वेळी त्यांनी व्यक्त केली. मागील काही महिन्यांपूर्वी येथील झोपडपट्टीतील निवासी झोपड्या व बिगरनिवासी झोपड्यांचे निष्कासन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे करण्यात आले होते. एकूण झोपडपट्टीधारकांपैकी २०९ पात्र झोपडपट्टीधारकांना प्रत्येकी ३५० स्क्वे. फूट घर या प्रकल्पात मिळणार आहे. झोपडपट्टीधारकांना या प्रकल्पात व्यायामशाळा, लिफ्ट, सोलर वॉटर, गार्डन यासारख्या सुविधा मिळणार आहेत. तसेच एकूण जागेपैकी
२ एकर जमीन पालिकेला उद्यान विकसनासाठी मिळणार आहे. विकसकामार्फत निर्वासित झोपडपट्टी धारकांची सोय जवळील ट्रांझिट कॅम्पमध्ये केली गेली आहे.
या वेळी माजी आमदार मोहन जोशी, माजी महापौर प्रशांत जगताप, नगरसेविका नंदा लोणकर, हाजी गफूर पठाण, माजी नगरसेवक नारायण लोणकर, आरती बाबर, पी. ए. इनामदार, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण प्रमुख कार्यकारी अधिकारी पांडुरंग गोळे, उपजिल्हाधिकारी गीता गायकवाड, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष रईस शेख, बांधकाम व्यावसायिक कृष्णकुमार गोयल, हाजी फिरोज शेख, विकसक आॅक्सफोर्ड प्रॉपर्टीजचे रोहित जोशी व लाभार्थी झोपडपट्टीधारक उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत सुरसे यांनी केले, तर आभार नंदा लोणकर यांनी मानले.