मतदान यंत्रणेचे नियोजन नाही
By Admin | Updated: January 26, 2017 00:59 IST2017-01-26T00:59:31+5:302017-01-26T00:59:31+5:30
महापालिका निवडणुकीसाठी १०० टक्के मतदान होईल, असे गृहीत धरून पुरेशी यंत्रणा नियोजित न करता पालिका निवडणुकीत कमी मतदान होईल

मतदान यंत्रणेचे नियोजन नाही
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी १०० टक्के मतदान होईल, असे गृहीत धरून पुरेशी यंत्रणा नियोजित न करता पालिका निवडणुकीत कमी मतदान होईल, असे गृहीत धरण्यात आले आहे. एका मतदान केंद्रावर ४ पेक्षा अधिक यंत्रे असू शकतात, हे गृहीत धरून अधिकारी, कर्मचाऱ्यांचे काम सुलभ व्हावे, या दृष्टीने नियोजन झाले नसल्याचे या यंत्रणेत प्रत्यक्ष काम करणाऱ्या जाणकारांचे गाऱ्हाणे आहे.
सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० ही मतदानाची वेळ आहे. मात्र, दिवसभरात कोणत्याही वेळी केंद्रावर रांगा लागण्याची, कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे एखाद्या केंद्रावर जास्त गर्दी होण्याची शक्यता असते. प्रभाग पद्धतीमध्ये होणाऱ्या मतदानामध्ये एका मतदाराला चारही मते देणे आवश्यक आहे. चार मते दिल्यानंतरच कंट्रोल पॅलेट दुसऱ्या मतदारासाठी खुले होणार आहे. त्यामुळे एखाद्या मतदाराने कमी मते देणे, चुकीचे बटण दाबले जाणे, अशिक्षित मतदारांना मतदान कसे करावे याची माहिती देण्यामध्ये वेळ द्यावा लागणे, असे प्रकार होऊ शकतात.
एका मतदान केंद्रावर मतदाराचे नाव यादीमध्ये पडताळून पाहणे, मतदार स्त्री-पुरुष असल्यास तशी नोंद करून तर्जनीला शाई लावणे, सर्व यंत्रांचे कंट्रोल युनिट नियंत्रित करणे आणि ही सर्व प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पडते किंवा कसे हे पाहणे, अशा स्वरूपाचे मतदान यंत्रणा काम करते.
एका मतदानासाठी साधारणत: ४० ते ५० सेकंद लागतात. मतदार ज्येष्ठवयीन असल्यास किंवा अशिक्षित असल्यास त्यापेक्षा अधिक वेळ लागत असल्याचे या यंत्रणेतील जाणकारांचे निरीक्षण आहे. कागदी मतपत्रिकेवर शिक्का मारण्याची पद्धत असताना एका केंद्रावर केंद्राध्यक्षासह ५ निवडणूक कर्मचारी असत. मतदान होईपर्यंत या कर्मचारी व अधिकाऱ्यांना जेवण करणे, नैसर्गिक विधीसाठी केंद्राबाहेर जाणे यांवर मोठी मर्यादा येते.