वाहन चोऱ्यांचा तपासच नाही
By Admin | Updated: July 5, 2015 01:05 IST2015-07-05T01:05:56+5:302015-07-05T01:05:56+5:30
शहरामधून ४ वर्षांत ९ हजार वाहने चोरीला गेली असून यातील दीड हजार वाहनेच पोलीस शोधू शकले आहेत. वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये

वाहन चोऱ्यांचा तपासच नाही
लक्ष्मण मोरे , पुणे
शहरामधून ४ वर्षांत ९ हजार वाहने चोरीला गेली असून यातील दीड हजार वाहनेच पोलीस शोधू शकले आहेत. वाहनचोरीच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या चार वर्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये झालेली लक्षणीय वाढ चिंताजनक असून दुर्दैवाने चोरीला गेलेल्या वाहनांच्या तपासाचे प्रमाण अगदी नगण्य आहे. खिशाला कात्री लावून, कष्टाची पै पै जमा करून खरेदी केलेली वाहने चोरीला गेल्यानंतर नागरिकांना त्याची आशाच सोडून द्यावी लागत आहे. पोलीस दप्तरीही वाहनचोरीचे गुन्हे तातडीने दाखल करून घेतले जात नसल्यामुळे सर्वसामान्यांनी दाद तरी मागायची कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सोसायट्यांमधून वाहने चोरीस जाण्याचे प्रमाण जास्त आहे़ सोसायट्यांनी दक्षता घेतली पाहिजे.
सिंहगड रस्त्यावर गेल्याच आठवड्यात एका माथेफिरूने नागरिकांची तब्बल ९० वाहने जाळली. मध्यमवर्गीयांच्या मालकीची ही वाहने जाळल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले. यासोबतच सर्वसामान्यांची वाहने दररोज चोरीला जात आहेत. पोलिसांकडील उपलब्ध आकडेवारीनुसार पुणे आणि पिंपरी चिंचवडमधून दिवसाला साधारणपणे आठ वाहने चोरीला जात आहेत. गेल्या चार वर्षांत ७ हजार ६३० दुचाकी, २४७ तीनचाकी आणि १ हजार १२ चारचाकी वाहने चोरीला गेली आहेत. यातील केवळ १ हजार ३८४ दुचाकी, ३५ तीनचाकी आणि १६५ चारचाकी पोलीस शोधू शकले आहेत. वाहन चोरीचे वाढलेले प्रमाण आणि हे गुन्हे उघडकीस आणण्याचे अत्यल्प प्रमाण यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरीला गेलेली वाहने शोधण्याचे तसेच या वाहनांचे नंतर नेमके होते काय, याचा शोध घेण्याचे ‘कर्तृत्व’ मात्र पोलीस दाखवताना दिसत नाहीत. उलट वाहन चोरीची तक्रार दाखल करायला गेल्यानंतर केवळ तक्रार अर्जावर भागवले जाते. वाहनमालकाला थातुरमातुर उत्तरे देऊन टोलवले जाते. वास्तविक तक्रारदाराची तक्रार विनाविलंब नोंदवून घेणे बंधनकारक आहे. गुन्हे शाखेचे वाहनचोरीविरोधी पथकही तत्कालीन प्रभारी पोलीस निरीक्षकाच्या ‘कर्तबगारी’मुळे बंद करावे लागले होते.
गेल्यावर्षी १० जुलै रोजी दगडुशेठ मंदिराच्या जवळ दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोट घडवून आणला. या स्फोटासाठी जी मोटारसायकल वापरण्यात आली ती एका पोलीस कर्मचाऱ्याची होती.
परराज्य कनेक्शन
पुण्यातून तसेच राज्यातून चोरलेली वाहने विशेषत: चारचाकी आणि दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशामध्ये विकली जातात. या वाहनांचा इंजिन क्रमांक बदलला जातो. तसेच चासी क्रमांकही बदलून टाकला जातो. परराज्यात नेऊन ही वाहने विकली जातात. तेथील यंत्रणांना हाताशी धरून वाहनांची नवीन कागदपत्रे तयार केली जातात.
चांगल्या घरातील मुलांचा समावेश
गेल्या वर्षी गुन्हे शाखेने काही वाहन चोरट्यांना पकडले होते. या चोरट्यांमध्ये राज्य राखीव पोलीस दलामध्ये काम करीत असलेल्या सहायक निरीक्षकाच्या मुलाचा समावेश होता; तसेच पोलिसांनी पकडलेल्या दुसऱ्या वाहनचोरांच्या टोळीमध्ये एका डॉक्टर दाम्पत्याचा मुलगा सहभागी होता. आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या घरातील मुलेही मौजमजेसाठी मोटारसायकल चोरतात.
कशी ‘लंपास’ केली जाते मोटारसायकल
मोटारसायकल अथवा दुचाकी चोरणे हे इतर वाहने चोरण्याच्या तुलनेत सोपे आहे. हँडल लॉक केलेल्या दुचाकींचे हँडल पायाने किंवा हाताने जोरात झटका देऊन तोडले जाते. त्यानंतर वाहनाचा स्वीच वेगळा केल्यानंतर क्षणार्धात वाहन सुरू होते. वाहन चोरट्यांकडे ‘मास्टर की’ नावाची चावी असते. या चावीच्या मदतीने कोणतेही वाहन सुरू करता येते.
नंबर प्लेट दुकानदारांवर हवा ‘वॉच’
वाहने चोरण्यासाठी सर्वाधिक वापर हा बनावट चावीचा होतो. अशा प्रकारच्या ‘मास्टर की’ किंवा बनावट चाव्या तयार करणाऱ्यांवर पोलिसांची नजर असणे आवश्यक आहे. यासोबतच चोरीच्या दुचाकीवर बनावट नंबर प्लेट लावून चोऱ्या केल्या जातात. त्यामुळे वाहनांवर बनावट नंबर प्लेट बसविण्यासाठी मदत करणाऱ्या नंबर प्लेट दुकानदारांवर नजर ठेवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची आवश्यकता आहे.