पीयूसी केंद्रांवर नियंत्रणच नाही
By Admin | Updated: March 11, 2015 01:07 IST2015-03-11T01:07:51+5:302015-03-11T01:07:51+5:30
वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाची चाचणी करणाऱ्या पीयूसी केंद्रांवर प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) कसलेही नियंत्रण नसल्याची

पीयूसी केंद्रांवर नियंत्रणच नाही
पुणे : वाहनांद्वारे होणाऱ्या प्रदूषणाची चाचणी करणाऱ्या पीयूसी केंद्रांवर प्रादेशिक परिवहन विभागाचे (आरटीओ) कसलेही नियंत्रण नसल्याची माहिती समोर आली आहे. या केंद्रांनी वाहनांची केलेली तपासणी तसेच त्यांच्याकडील वाहनांच्या माहितीची कोणतीही नोंद कुठेही ठेवली जात नाही. ही सर्व माहिती पीयूसी केंद्रांपर्यंतच मर्यादित राहत आहे. त्यामुळे पीयूसी केंद्रे केवळ उपचारासाठीच असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
पुण्यात पेट्रोल पंपावरील व फिरती अशी एकूण २१६ पीयूसी केंद्रे आहेत. या केंद्रांना आरटीओमार्फत परवाने देण्यात आले आहेत. तसेच, या केंद्रांकडून अयोग्य पद्धतीने चाचणी किंवा प्रमाणपत्र दिले जात असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार आरटीओला आहे. मात्र, एखाद्या केंद्राबद्दल तक्रार आल्यानंतरच आरटीओकडून संबंंधित केंद्राची तपासणी केली जाते. काही केंद्रचालकांकडून वाहनचालकांना बोगस पीयूसी दिले जात असल्याची बाब ‘लोकमत’ने उजेडात आणली होती. तसेच, चाचणी घेताना निष्काळजीपणा केल्याचेही समोर आले होते. याबाबत अधिक माहिती घेतली असता केंद्रांवर परिवहन विभागाचे कसलेही नियंत्रण नाही. केंद्रांना मुंबईतून परिवहन विभागाकडून पीयूसी चाचणी प्रमाणपत्रे दिली जातात. एकदा ही प्रमाणपत्रे केंद्रचालकाच्या ताब्यात आल्यानंतर त्यांचे पुढे काय होते, याची माहिती विभागाकडे संकलित होत नाही.
पीयूसी केंद्रचालकांना दिल्या जाणाऱ्या प्रमाणपत्रांमध्ये दोन प्रती असतात. वायूंचे प्रमाण नमूद करून एक प्रत वाहनचालकालला दिली जाते, तर दुसरी केंद्रचालकाकडेच असते. या प्रतीचा पुढे कोणताही लेखाजोखा परिवहन विभागाकडे जमा केला जात नाही. त्यामुळे केंद्रचालकांनी दिलेल्या प्रमाणपत्रांची कसलीही नोंद विभागाकडे मिळत नाही. परिणामी, काही केंद्रचालकांकडून बोगस प्रमाणपत्रे दिली जातात. प्रमाणपत्रावर खोट्या नोंदीचा प्रकारही उजेडात आला आहे. परिवहन विभागाने याकडे लक्ष देऊन पीयूसी केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा निर्माण करण्याची गरज आहे.
(प्रतिनिधी)