चोरांच्या हाती तिजोरीच्या चाव्या नको
By Admin | Updated: February 14, 2017 01:48 IST2017-02-14T01:48:40+5:302017-02-14T01:48:40+5:30
‘चोरांच्या हाती तिजोरीची चावी गेली तर केंद्र व राज्याचा पैसा तुमच्यापर्यंत येणार नाही. चोरांचे राज्य आता संपवायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी

चोरांच्या हाती तिजोरीच्या चाव्या नको
पुणे : ‘चोरांच्या हाती तिजोरीची चावी गेली तर केंद्र व राज्याचा पैसा तुमच्यापर्यंत येणार नाही. चोरांचे राज्य आता संपवायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्हिजन मोठे आहे, ते पुण्यात आणू, त्यासाठी महापालिकेची सत्ता द्या, तुमची स्वप्नपुर्ती करू ’असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
पर्वती विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या महापालिकेतील उमेदवारांसाठी सातारा रस्त्यावरील वाळवेकर लॉन येथे मुख्यमंत्र्यांची सभा झाली. पालकमंत्री गिरीश बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ तसेच पर्वती मतदार संघातील सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘सत्ता नसतानाही केंद्र व राज्याच्या मदतीने आम्ही अनेक योजना पुण्यासाठी आणल्या. त्यांनी सत्तेच्या गेल्या ५ वर्षात तुमच्यासाठी काय केले याचा तुम्हीच विचार करा. निवडणूक आली की त्यांना गरीब आठवतात, निवडणुकीनंतर त्यांना विसरतात. गरीबांचे घर होत नाही, त्यांचे बंगले होतात, श्रीमंती वाढते. अशांचे राज्य संपवायला हवे. केंद्राची स्मार्ट सिटी योजना श्रीमंतांसाठी नाही तर गरीबांसाठीच आहे. त्यातील सर्व योजना गरीबांसाठीच आहेत.’’
काँग्रेसचे अस्तित्वच राहिलेले नाही, राष्ट्रवादीला कोणी विचारत नाही व शिवसेना कोणाशाही तडजोड करायला तयार आहे अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांचा समाचार घेतला. ते म्हणाले,‘‘ पंतप्रधानांनी युवकांसाठी विविध योजना आणल्या आहेत. सन २०२२ पर्यंत भारतीतील एकही व्यक्ती घराविना राहणार नाही. राज्याने सन २०१९ पर्यंतच महाराष्ट्रातील प्रत्येकाला घर मिळेल अशी योजना केली आहे. अशा योजनांसाठी महापालिकेत सत्ता हवी.’’
पालकमंत्री बापट म्हणाले,‘‘ गेल्या २५ वर्षात त्यांना पुण्यासाठी काहीच करता आलेले नाही. आम्ही प्रत्येक समस्येचा विचार करून त्यावर उपाय काढत आहोत. क्रांतीवीर लहूजी यांचे भव्य स्मारक आम्ही करणार आहोत.’’ राज्यमंत्री कांबळे, आमदार मिसाळ, उमेदवार श्रीनाथ भिमाले, हरिष परदेशी, मानसी देशपांडे यांची भाषणे झाली. पर्वती मतदार संघातील सर्व उमेदवार यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपात प्रवेश केला, त्यांचा सत्कार करण्यात आला.