विभागलेले महापुरुष एकत्र करण्याची गरज
By Admin | Updated: January 25, 2017 02:13 IST2017-01-25T02:13:48+5:302017-01-25T02:13:48+5:30
सर्व महापुरुषांचे सामर्थ्य त्यांच्या जातीपुरतेच संकुचित केले गेले आहे. विभागलेले महापुरुष एकत्र करण्याची आता गरज निर्माण

विभागलेले महापुरुष एकत्र करण्याची गरज
पुणे : सर्व महापुरुषांचे सामर्थ्य त्यांच्या जातीपुरतेच संकुचित केले गेले आहे. विभागलेले महापुरुष एकत्र करण्याची आता गरज निर्माण झाली आहे, असे मत ८९व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
‘अग्निपंख’ आयोजित दुसऱ्या युवा मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोमवारी झाला. त्या वेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, संमेलनाचे अध्यक्ष वीरा राठोड, माजी आमदार उल्हास पवार, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी, सचिन इटकर, प्रकाश पवार, सचिन सानप, कृष्णा काजळे, ज्ञानेश्वर मोडक, संकेत पडवळ, हनुमंत पवार उपस्थित होते.
सबनीस म्हणाले, ‘‘सांस्कृतिक आव्हान पेलण्यासाठी तरुणांनी पुढे येण्याची गरज आहे. आज भटक्या विमुक्त समाजातील तरुण या संमेलनाचा अध्यक्ष आहे. त्यामुळे ज्ञानेश्वर फक्त जानव्यात, आळंदीत किंवा पुण्यात जन्मला येतो, असे नसून भटक्या तांड्यातही तो जन्म घेत आहे.’’
युवकांची, परिवर्तनाची देशाला सातत्याने गरज असून, त्यासाठी साहित्य हे महत्त्वाचे माध्यम आहे. सोशल मीडियासारख्या माध्यमांचा वापर विचार परिपक्व करण्याच्या दृष्टीने तरुणांनी करायला हवा. या माध्यमांमधील विकृतींपासून दूर राहायला हवे. आपल्यासमोर धार्मिक विकृतीला बळी पडणाऱ्या तरुणाईला वाचवण्याचे मोठे आव्हान आहे. भाकरीपासून ते लग्नापर्यंतचे तरुणांचे प्रश्न विवेकाने सोडवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.
भाई वैद्य म्हणाले, ‘‘देशात सध्या स्वातंत्र्य चळवळीपेक्षा बिकट आव्हान तरुणांसमोर आहे. त्या आव्हानांना तोंड देताना परिणामी स्वकीयांच्याही विरोधात जाण्याची तयारी तरुणांनी ठेवायला हवी. तरुण भविष्याची आशा आहेत. मात्र, या देशात भविष्य कशा प्रकारचे घडणार आहे याचा प्रश्न पडला आहे. धर्मनिष्ठ राष्ट्र निर्माण करत असताना जे जन्मत: बंडखोर असतात अशा तरुणांना धाकात ठेवण्याचा प्रयत्न सध्या होत आहेत.
(प्रतिनिधी)