पुणे : बीड मधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे हीच माझी भूमिका आहे. माझं कुठलंही भाषण काढा. मी कधीही आरोपींचे समर्थन केलेल नाही मात्र मला आता जिवे मारण्याचे कॉल येत आहे. आत्ताच मला एका अनोळखी नंबर वरून फोन आला तू तुझ्या घरचे बघ, तुझ्या मागे कुत्र नाही अशी धमकी दिली आहे, असे ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून माझ्या गाडीला कट मारले जात आहेत. मी कुठल्या हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबलो तर लोक घोळका करून माझ्याकडे येत आहेत. मला रोज शंभरहून अधिक धमकीचे फोन कॉल घेत असल्याचे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.
हाके म्हणाले, लातूर जिल्ह्यातील धनगर समाजातील मुलाची हत्या ऑनर किलिंग मधून झाली आहे. सैराट चित्रपट यासारखी लातूर मधील ही घटना आहे. माऊली सोट याला न्याय मिळणार का? असा प्रश्न आमच्या समोर उभा राहिला आहे. कारण मुख्य आरोपी सोबत अभिमन्यू पवार यांचे फोटो आहेत. आरोपी सोबत फोटो आहेत म्हणून अभिमन्यू पवार यांनी राजीनामा द्यावा मी असं म्हणणार नाही. असेही हाके म्हणाले.
परभणी येथे सूर्यवंशी कुटुंबाची भेटीसाठी गेलेल्या लक्ष्मण हाके यांना बोलण्यापासून रोखण्यात आले होते. याबाबत बोलताना लक्ष्मण हाके म्हणाले, परभणी मध्ये जेव्हा मी श्रध्दांजली व्हायला उभे राहिलो तेव्हा मी फडणवीस यांचा हस्तक आहे, तुम्ही आरोपींची बाजू घेता असं म्हणत एका व्यक्तीने मला बोलण्यापासून रोखलं परंतु नंतर त्याला माझी भूमिका सांगितल्यानंतर त्या व्यक्तीने तुम्ही आमच्या बरोबर रहा आम्ही तुमच्या बरोबर राहू असं मला सांगितलं असल्याचे स्पष्टीकरण हाके यांनी दिला.
एका समाजाला टार्गेट करणे अत्यंत चुकीचे
संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे, मी कधी ही आरोपींना समर्थन दिलेलं नाही. मात्र लोकप्रतिनिधी जे डायलॉग बाजी करतात त्यांना विनंती आहे एका समाजाला टार्गेट करत आहेत हे अत्यंत चुकीच आहे, असे लक्ष्मण हाके यांनी सांगितले.