फायर आॅडिट हवेच

By Admin | Updated: February 16, 2016 01:46 IST2016-02-16T01:46:07+5:302016-02-16T01:46:07+5:30

सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यामध्ये सवाई गंधर्व, वसंतोत्सवापासून ते नट-नट्यांच्या, गायकांच्या मोठमोठ्या कार्यक्रमांचे नेहमी आयोजन केले जाते.

There is fire audit | फायर आॅडिट हवेच

फायर आॅडिट हवेच

पुणे : सांस्कृतिक नगरी असलेल्या पुण्यामध्ये सवाई गंधर्व, वसंतोत्सवापासून ते नट-नट्यांच्या, गायकांच्या मोठमोठ्या कार्यक्रमांचे नेहमी आयोजन केले जाते. यासोबतच गणेशोत्सव, नवरात्रोत्सवांचे भव्य सेट, शहराच्या विविध भागांमध्ये अलीकडच्या काळात रंगणारे पैठणींचे कार्यक्रम, जंगी पार्ट्या आणि लग्नसमारंभ...या सर्वांनाच आगीचा धोका असतो. पोलीस आणि अग्निशामक दलाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे तसेच सुरक्षा नियमावलीचे पालन न केल्यामुळे मोठ्या दुर्घटना घडतात. मुंबईमध्ये ‘मेक इन इंडिया’च्या कार्यक्रमादरम्यान सेटला लागलेल्या आगीमध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले. सुदैवाने या अग्नितांडवामध्ये कोणालाही इजा झाली नाही, तसेच जीवितहानीही झाली नाही.
अग्निशामक दल आणि पोलिसांनी घेतलेल्या ‘फायर आॅडिट’मुळे संभाव्य जीवितहानी टळली. अलीकडच्या काळात पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत.
विशेषत: बालेवाडी आणि मोकळ्या मैदानांवर सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच मोटारी, फर्निचर, बांधकाम व्यवसाय, गृहोपयोगी वस्तू, कापड, शैक्षणिक अशा स्वरूपाची मोठमोठी प्रदर्शने आयोजित केली जातात.
असे कार्यक्रम आयोजित करताना जागेची मर्यादा आणि येणारी संभाव्य गर्दी याचा प्रकर्षाने विचार करणे आवश्यक असते. मात्र, आयोजकांकडून अनेकदा त्याचा विचार केला जात नाही. भव्य कार्यक्रम आयोजित करताना अग्निशामक दल, पोलीस, करमणूक विभाग, महापालिका यांची परवानगी आवश्यक असते. विशेषत: अग्निशामक दल आणि पोलिसांच्या परवानगी या सुरक्षेच्या दृष्टिकोनामधून फारच महत्त्वाच्या असतात. सुरक्षा व्यवस्थेची तसेच दुर्घटना घडल्यास केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची प्रत्यक्ष पाहणी करून या दोन्ही घटकांनी परवानगी देणे आवश्यक असते. मात्र, अनेकदा ‘स्पॉट व्हिजिट’ न करताच परवानग्या दिल्या जातात. नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचाच हा प्रकार आहे. नागरिकांनीही कार्यक्रमांना जाताना आपत्कालीन मार्ग, अग्निरोधक यंत्रणा याची माहिती घेतली पाहिजे. जेणेकरून दुर्घटना घडलीच तर सुखरूप बाहेर पडता येईल. दुर्घटना घडल्यानंतर सर्वांत मोठी भीती चेंगराचेंगरी होण्याची असते. त्यामुळे गर्दीचे नियंत्रण आणि बाहेर पडण्यासाठी भरपूर मार्ग असायला हवेत. परंतु आयोजकांकडून याबाबतीत लक्ष घातले जात नसल्याचे अग्निशामक दलाचे निरीक्षण आहे.
अग्निशामक दलाकडून आयोजकांना ‘टेम्पररी स्ट्रक्चर’ नियमावलीचे पालन करण्यासंदर्भात पत्र दिले जाते. आसन व्यवस्थेमध्ये दोन व्यक्ती, दोन खुर्च्यांमध्ये किती अंतर असावे इथपासून आपत्कालीन मार्गाच्या रचनेपर्यंतची सर्व माहिती दिली जाते. कार्यक्रमासाठी मंडप उभारण्यात येणार असल्यास त्यासाठी आपत्कालीन मार्गांची पुरेशी रचना असणे आवश्यक आहे. यासोबत प्रदर्शनांमध्ये अग्निशामक दलाचा बंब असणे आवश्यक आहे. मोठ्या कार्यक्रमांमध्ये ‘फायर व्हेईकल्स’ राखीव ठेवणे बंधनकारक आहे. अग्निशामक दलाकडून वाहने घेतल्यास नाममात्र शुल्क आकारून ही वाहने पुरवली जातात.
पोलिसांकडून कार्यक्रमांना लाऊड स्पीकर परवाना तसेच कार्यक्रमासाठी परवानगी दिली जाते. परंतु, पोलिसांची भूमिका कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण न होऊ देण्याची असते. कार्यक्रम, प्रदर्शनांमध्ये येणाऱ्यांची तसेच मालमत्तेच्या रक्षणाची जबाबदारी आयोजकांचीच आहे. त्यासाठी ते शुल्क आकारत असतात. पोलिसांकडून कायदा व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये हे पाहिले जाते. मात्र, पोलीस आणि अग्निशामक दलाच्या खांद्यावर सुरक्षा टाकून आयोजक निर्धास्त होतात. दुर्घटना घडल्यास परिस्थिती नाजूकपणे हाताळणे महत्त्वाचे असते. जीवितहानी होऊ नये, जखमींना तातडीने उपचार मिळावेत यासाठी रुग्णवाहिका आणि डॉक्टर उपलब्ध ठेवणे हीसुद्धा आयोजकांचीच जबाबदारी आहे. मात्र, फायदा कमावण्याच्या नादात नागरिकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते, ही बाब गंभीर आहे.
- श्रीकांत पाठक, उपायुक्त, विशेष शाखा, पुणे पोलीसकार्यक्रम आयोजकांकडून अग्निप्रतिरोधक यंत्रणा, गर्दीचे नियोजन, आपत्कालीन मार्ग याचा अनेकदा विचारच केला जात नाही. कोणतीही दुर्घटना घडलीच तर अग्निशामक दल, पोलीस घटनास्थळी काही मिनिटांतच धावतात. बचावकार्य तेच करीत असल्यामुळे आयोजक निर्धास्त असतात. आयोजकांनी सुरक्षेची काळजी घेणे बंधनकारकच आहे. मात्र, त्यांच्याकडून काळजी घेतली जात नाही. अनेकदा आसनक्षमतेपेक्षा अधिक लोकांचा भरणा केला जातो. त्यामुळे चेंगराचेंगरीचा प्रकार घडू शकतो. दलाकडून कार्यक्रमस्थळाची पाहणी करूनच परवानगी दिली जाते.
- प्रशांत रणपिसे,
प्रमुख अग्निशामक दल, पुणे

Web Title: There is fire audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.