वाघोली : वाघोली येथील दौऱ्यात वाघेश्वर मंदिरात विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे व मंत्री भरत गोगावले यांनी सोमवारी (दि. २८) अभिषेक करून दर्शन घेतले. वाघेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान आहे. देवाने आत्तापर्यंत बऱ्याच इच्छा पूर्ण केल्या आहेत. पालकमंत्रिपदाची इच्छा पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जो काही निर्णय घेतील तो आम्ही स्वीकारू. आम्हाला वाटणारा निर्णय लवकरच योग्य वेळेला होईल, असे मंत्री भरत गोगावले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
गोगावले म्हणाले, माजी मुख्यमंत्री शिंदे व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत. त्यांच्यात काही मतभेद नाहीत ते उभे केले आहेत. काही निर्णय बदलावे लागतात. काहींमध्ये दुरुस्त्या, सुधारणा कराव्या लागतात. त्यामुळे असे काही मतभेद नाहीत. आमदार गायकवाड यांनी पोलिसांबद्दल जे वक्तव्य केले आहे. त्याबाबत एकनाथ शिंदे यांनी त्यांना समज दिली आहे. माजी आमदार बच्चू कडू आमच्याकडून असते तर ते आमदार झाले असते. राज्यातील काही नवीन आमदार मात्र हवेतच असतात. त्यांनी हवेत न राहता जनतेची सेवा केली पाहिजे, असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
नीलम गोऱ्हे यांनी दिला आठवणींना उजाळा
शाळेचे उद्घाटन केल्यानंतर नीलम गोऱ्हे म्हणाल्या, कार्यक्रमाच्या ठिकाणी येताना वाघेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि अत्यंत प्रसन्न वाटले. तसेच माझे वडील दिवाकर गोऱ्हे यांनी याच वाघोली भागात जनावरांवरील खुरकुत्या रोगांवरील लस तयार करण्यासाठीचे काम केले. ती त्यांची कर्मभूमी होती, या शब्दांमध्ये त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.