संगणक आहेत; मात्र दुरुस्तीची यंत्रणाच नाही
By Admin | Updated: December 23, 2015 00:16 IST2015-12-23T00:16:49+5:302015-12-23T00:16:49+5:30
जीपीएस यंत्रणा आहे, मात्र ती पाहणारे मॉनिटरच नाही. या पालिकेच्या शेखचिल्ली कारभारानंतर आता शिक्षण मंडळातील संगणक आहेत,

संगणक आहेत; मात्र दुरुस्तीची यंत्रणाच नाही
पुणे : जीपीएस यंत्रणा आहे, मात्र ती पाहणारे मॉनिटरच नाही. या पालिकेच्या शेखचिल्ली कारभारानंतर आता शिक्षण मंडळातील संगणक आहेत, पण त्यांच्या दुरूस्तीची यंत्रणाच नाही, असा अजब
कारभार समोर आला आहे.
त्यामुळे एखादा संगणक बंद पडला, की तो कायमचा बंद पडला, अशीच शिक्षण मंडळातील संगणकांची स्थिती आहे.
पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांनाही संगणक शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी शिक्षण मंडळाच्या वतीने दरवर्षी लाखो रुपयांची संगणक खरेदी करण्यात येते; मात्र त्याचबरोबर या संगणकांच्या दुरूस्तीसाठी काही स्वतंत्र यंत्रणा निर्माण केली पाहिजे, याचा प्रशासनाला विसर पडला. शिक्षण मंडळ कार्यालयात व काही शाळांमध्ये असे सुमारे २५० संगणक सध्या मंडळाकडे आहेत. त्यांच्यातील काही बंद आहेत. दुरूस्तीच होत नसल्यामुळे ते सध्या धूळ खात पडले आहेत.
यावर्षीच्या शिक्षण मंडळाच्या अंदाजपत्रकात सुमारे २ कोटी रुपये फक्त संगणक खरेदीसाठी दर्शविण्यात आले आहेत. त्याचबरोबर मुख्याध्यापकांच्या कार्यालयात इंटरनेट सुविधाही देण्यात येणार आहे. मात्र, हे करतानाही दुरूस्तीसाठी म्हणून स्वतंत्र अंदाजपत्रक दाखवण्यात आलेले नाही. त्याची गरजच प्रशासनाला वाटलेली नाही.
ही व्यवस्था करण्यात येणार आहे, असे मंडळाचे अध्यक्ष तसेच प्रशासन प्रमुखांकडून सांगितले जाते. मात्र तशी काहीही हालचाल नसल्याचे काही अधिकाऱ्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)