शहरामध्ये २२०० अनधिकृत मोबाईल टॉवर

By Admin | Updated: September 12, 2014 03:22 IST2014-09-12T03:22:16+5:302014-09-12T03:22:16+5:30

नेमकी किती मोबाईल टॉवर आहेत, याबाबत वेळोवेळी खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या महापालिकेने अखेर शहरात २२०० अनधिकृत मोबाईल टॉवर असल्याची कबुली माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या उत्तरामध्ये दिली

There are 2200 unauthorized mobile towers in the city | शहरामध्ये २२०० अनधिकृत मोबाईल टॉवर

शहरामध्ये २२०० अनधिकृत मोबाईल टॉवर

दीपक जाधव, पुणे
शहरामध्ये नेमकी किती मोबाईल टॉवर आहेत, याबाबत वेळोवेळी खोटी माहिती देऊन दिशाभूल करणाऱ्या महापालिकेने अखेर शहरात २२०० अनधिकृत मोबाईल टॉवर असल्याची कबुली माहिती अधिकारांतर्गत दिलेल्या उत्तरामध्ये दिली आहे. राज्य माहिती आयोगाने दिलेल्या दणक्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोबाईल टॉवरची माहिती जाहीर केली आहे. मात्र, या मोबाईल कंपन्यांवर कारवाई करण्यास का टाळाटाळ केली जात आहे, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरितच आहे.
नागरिकांनी मिळकत कर न भरल्यास, त्यांच्या घरी बँडबाजा घेऊन जाऊन त्यांच्यावर कारवाई करणारे महापालिकेचे अधिकारी उघड-उघड कोट्यवधींचा महसूल बुडविणाऱ्या मोबाईल कंपन्यांविरुद्ध मात्र मूग गिळून शांत बसले आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार- शहरामध्ये आयडिया, बीएसएनएल, वोडाफोन, रिलायन्स, इंडस, जीटीएल आदी कंपन्यांचे २२४९ मोबाईल टॉवर आहेत. त्यापैकी केवळ ४७ मोबाईल टॉवरकरिताच रितसर कर भरून परवानगी घेण्यात आली आहे. उर्वरित मोबाईल टॉवर कोणतीही परवानगी न घेता दिमाखात उभे आहेत.
शहरातील अनधिकृत मोबाईल टॉवरचा विषय चर्चेत आल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबतची आकडेवारी दडवून ठेवण्याचा प्रयत्न केला होता. सर्वसाधारण सभेत या विषयावर जोरदार चर्चा होऊनही त्याविरुद्ध काहीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी याबाबतची माहिती महापालिकेकडे मागितली होती.

Web Title: There are 2200 unauthorized mobile towers in the city