...तर पुण्याला दोन दिवसांतून एकदा पाणी

By Admin | Updated: May 4, 2016 04:36 IST2016-05-04T04:36:48+5:302016-05-04T04:36:48+5:30

दौंड-इंदापूरसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी व तेही कालव्याने सोडण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सल्ला डावलून घेतला आहे. त्यामुळे पुण्याला दोन दिवसांतू

... then water it once in two days to Pune | ...तर पुण्याला दोन दिवसांतून एकदा पाणी

...तर पुण्याला दोन दिवसांतून एकदा पाणी

पुणे : दौंड-इंदापूरसाठी आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी व तेही कालव्याने सोडण्याचा निर्णय पालकमंत्र्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सल्ला डावलून घेतला आहे. त्यामुळे पुण्याला दोन दिवसांतून एकदा पाणी दिले जाण्याची शक्यता पाटबंधारे खात्यातील अधिकारी खासगीत व्यक्त करीत आहेत. त्यानंतर कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली, तर त्याला पालकमंत्रीच जबाबदार असतील, अशी टीका महापौर प्रशांत जगताप यांनी केली.
दौंड-इंदापूरला पाणी देताना पालकमंत्री गिरीश बापट पुण्याचा विचार करीत नाहीत. त्यांचे पुण्यातील सर्व आमदारही मूग गिळून गप्प बसले आहेत. महापौर म्हणून आपल्यासह सर्व लोकप्रतिनिधींना अंधारात ठेवून पालकमंत्र्यांनी दौंड-इंदापूरला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला, असा आरोप महापौर जगताप यांनी केला. आॅक्टोबरमध्ये पाण्याचे नियोजन करणे गरजेचे होते. त्यांनी केले नाही. आता ते करीत असलेले नियोजनही चुकीचेच आहे. त्यांना अर्धा टीमसी पाणी हवे आहे, मात्र पालकमंत्र्यांनी १ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यातून पुण्यासाठी येत्या महिनाभरात भीषण स्थिती निर्माण होऊ शकते. खुद्द पाटबंधारे खात्याचे अधिकारीही खासगीत बोलताना पुण्याला दोन दिवसाआड पाणी द्यावे लागेल, असे बोलत असल्याचे महापौर म्हणाले.
कालव्याने पाणी सोडले, तर ते तिथे पोहोचण्यासाठी ३ दिवस लागतील. कालवा कोरडा आहे. बरेचसे पाणी झिरपून जाईल. शेतीसाठी पाणी चोरले जाईल. त्यामुळेच महापालिकेने पाणी टँकरने द्यावे, असा पर्याय दिला होता. त्यासाठी होणारा खर्च करण्याची तयारी दर्शवली होती.
तसे लेखी पत्र पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. पालकमंत्र्यांनी त्याचा विचारच केला नाही व १ टीएमसी पाणी कालव्याने सोडण्याचा निर्णय घेतला. असे करून ते कोणाचे भले करीत असतील, पुणेकरांचे मात्र नुकसानच करीत आहे, असे महापौर म्हणाले.
(प्रतिनिधी)

टँकरचा खर्च करायला पालिका तयार
टँकरला फार खर्च येईल असे म्हणतात, मात्र पालिका तो खर्च करायला तयार आहे. त्यात काही अडचणी असतील, तर महापौरांचा निधी त्यासाठी खर्च करण्याची तयारी आहे.पण पालकमंत्र्यांनी अजूनही विचार करावा. महापालिकेला विश्वासात न घेता केलेला कालव्याने पाणी देण्याचा निर्णय मागे घ्यावा, असे आवाहन महापौर जगताप यांनी केले.

५ लाख वारकऱ्यांना पाणी दिलेच पाहिजे
पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांनी असे करण्यास
विरोध केला होता, अशी आपली माहिती असल्याचे
सांगून महापौर म्हणाले, की पुण्याच्या पाण्यात कसलीही कपात होणार नाही, असे ते म्हणतात. मात्र, त्यांच्या नियोजनात पुण्यात जूनमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांच्या पाण्याचे नियोजनच केलेले नाही. किमान ५ लाख
वारकरी पुण्यात येतात. त्यांना पाणी देता आले नाही, तर अवघड होईल. मनसेने केलेले आंदोलन चुकीचेच आहे, मात्र अशी स्थिती आगामी काळात निर्माण होणार नाहीच, असे नाही. दुर्दैवाने तसे झाले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी पालकमंत्र्यांचीच असेल, असा इशारा महापौरांनी दिला.

Web Title: ... then water it once in two days to Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.