त्यांचा ‘सेटअप’ विस्कटला
By Admin | Updated: November 16, 2016 03:23 IST2016-11-16T03:23:43+5:302016-11-16T03:23:43+5:30
नाटकासाठी कथेनुरूप सेट तयार उभारणे, रंगमंचावर आकर्षक प्रकाशयोजना करून रसिकांना भुरळ घालणारे, तसेच नाटक सुरू होण्याआधीपासून ते

त्यांचा ‘सेटअप’ विस्कटला
पुणे : नाटकासाठी कथेनुरूप सेट तयार उभारणे, रंगमंचावर आकर्षक प्रकाशयोजना करून रसिकांना भुरळ घालणारे, तसेच नाटक सुरू होण्याआधीपासून ते नाटक संपल्यानंतरही राबणारे अशा सर्व पडद्यामागील कलाकारांनाही जुन्या नोटांच्या बंदीचा फटका बसला आहे. प्रसंगानुरूप सेटअप उभारून नाटकात जान आणणाऱ्या पडद्यामागील कलाकारांच्या संसाराचा ‘सेटअप’ मात्र सध्या विस्कटला आहे.
५००-१०००च्या नोटांच्या बंदीचा फटका नाटकाच्या पडद्यामागील कलाकारांना बसताना दिसतोय. घरातील दैनंदिन खर्चासाठी सुटे पैसे संपल्याने आता करायचे काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे अनेक नाटकांचे प्रयोग रद्द झाले आहेत. तर काही नाटकांच्या प्रयोगांचे प्रमाण कमी झाल्याने त्याचाही फटका या पडद्यामागील कलाकारांना सोसावा लागत आहे.
या कलाकारांना कामाचे पैसे हे रोखीतच मिळत असल्याने अनेकांची बँक खाती नाहीत. तर अनेकांची खाती असली, तरी बँकेतील व्यवहार कसे करायचे, याची फारशी माहिती नाही. त्यातच एटीएम बंद असल्याने सगळ््याच बाजूंनी या कलाकारांची अडचण झालेली आहे.
‘चिरंजीवी आईस’ या नाटकाचे नेपथ्य तयार करणाऱ्या कलाकारांनी कष्टाने नेपथ्य तयार करण्यास सुरुवात केली, मात्र नोटाबंदीच्या निर्णयामुळे या नाटकाचा प्रयोगच रद्द झाल्याने या कलाकारांची मेहनत वाया गेली.
अशीच काहीशी परिस्थिती लावणी कलावंतांची व निर्मात्यांची झाली आहे. कार्यक्रमाला तिकिट बुकिंगच होत नसल्याने कार्यक्रम रद्द करण्याची वेळ निर्मात्यांवर आली आहे. बँकेतून केवळ २हजाराच्या नोटा मिळत असल्याने पैसे सुटे करण्यात अडचण येत आहे. त्यामुळे या कलाकारांची ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी परिस्थिती झाली आहे. (प्रतिनिधी)