येरवडा : विमाननगरमधील एका मॉलमधील चांदीच्या दुकानामध्ये झालेल्या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या ६ तासांमध्ये आरोपीला मुद्देमालासह अटक करण्यात विमानतळ पोलिसांना यश आले आहे.नारायण लक्ष्मण खरात (वय १९, रा.म्हाडा कॉलनी, विमाननगर) असे या प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून सुमारे ७ लाख ८ हजारांचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. खरात हा फिनिक्स मॉलमधील दुसऱ्या मजल्यावरील पीव्हीआर सिनेमागृहात कामाला आहे. त्याने बनावट चावीच्या साह्याने ही चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याकडून चोरी केलेले सर्व दागिने हस्तगत करण्यात आले. खरातला बनावट चावी कशी मिळाली, याचा पोलीस तपास करीत असून, या चांदीच्या दुकानातील कर्मचाऱ्याचा यामध्ये सहभाग असण्याची शक्यता आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय कुरुंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष जगताप, संभाजी तांबे, विश्वनाथ गोणे, संजय आढारी, राजेंद्र गायकवाड, नवनाथ वाळके, रमेश नाईकवडी, अविनाश संकपाळ, पालवे यांनी गुन्ह्याचा यशस्वी तपास केला. (वार्ताहर)
मॉलमधील चोरी; तरुणास अटक
By admin | Updated: September 1, 2015 04:09 IST