प्रतिक्षा संपली! तब्बल २ वर्षानंतर कात्रजचे प्राणी संग्रहालय सुरू, पर्यटकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2022 02:40 PM2022-03-20T14:40:06+5:302022-03-20T14:40:23+5:30

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत त्याचबरोबर तरुणाई फोटो आणि सेल्फी मध्ये मग्न झाल्याचे चित्र संपूर्ण परिसरात दिसून आले

The wait is over! After 2 years, Katraj zoo started, tourists were welcomed with roses ... | प्रतिक्षा संपली! तब्बल २ वर्षानंतर कात्रजचे प्राणी संग्रहालय सुरू, पर्यटकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत...

छायाचित्र - तन्मय ठोंबरे

googlenewsNext

धनकवडी : देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण, कात्रजची प्रतिष्ठा आणि पुणे शहराचे वैभव असलेले कात्रज येथील राजीव गांधी प्राणिसंग्रहालय तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर आज पर्यटकांसाठी खुले करण्यात आले. यावेळी पर्यटकांमध्ये एकच उत्साह पाहवयास मिळाला. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत त्याचबरोबर तरुणाई फोटो आणि सेल्फी मध्ये मग्न झाल्याचे चित्र संपूर्ण परिसरात दिसून आले तर प्राणी संग्रहालय प्रशासनाकडून येणाऱ्या पर्यटकांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर १४मार्च २०२० ला प्राणी संग्रहालय बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. दरम्यान यापूर्वी प्राणी संग्रहालय १ डिसेंबर २०२१ रोजी पुन्हा चालू करण्याचा प्रस्ताव संग्रहालय प्रशासनांकडून महापालिकेला देण्यात आला होता. मात्र, तो प्रस्तावही ओमायक्रॉन व्हेरिएंटच्या धर्तीवर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तालयांकडून फेटाळण्यात आला होता. यानंतरच्या काळात मंदिरे, हॉटेल, उद्याने खुली झाली आहेत. मात्र, प्राणीसंग्रहालयाला परवानगी मिळत नसल्याने पर्यटकांचा हिरमोड होत होता आणि प्राणीसंग्रहालय चालू करण्याची मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने प्राणी संग्रहालय चालू करण्याचा निर्णय घेतला आणि पर्यटकांनी स्वागत केले.

नवे प्राणी पाहायला मिळणार

 दोन वर्षानंतर राजीव गांधी प्राणीसंग्रहालय पर्यटकांसाठी खुले झाले आहे. पर्यटकांना राज्य प्राणी शेकरू, जंगल कॅट, लेपरड कॅट हे नवे प्राणी पाहायला मिळणार आहेत. पर्यटकांना प्रवेश करण्यापूर्वी कोरोना लसीचे दोन डोस घेणे आवश्यक आहे, तसे दोन्ही लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य आहे. तरच प्राणिसंग्रहालयात प्रवेश देण्यात येत आहे.

दोन वर्षात बुडाले तब्बल बारा कोटीचे उत्पन्न

कोरोना काळापूर्वी दिवसाला साधारण चार ते पाच हजार नागरिक प्राणी संग्रहालयाला भेट देत होते. तर हाच आकडा रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी दहा हजारापर्यंत जात असे. प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी आकारण्यात येत असलेल्या तिकीटाच्या माध्यमातून दरमहा अंदाजे पन्नास लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. त्या नुसार दोन वर्षात तब्बल बारा कोटीचे उत्पन्न बुडाले आहे.

Web Title: The wait is over! After 2 years, Katraj zoo started, tourists were welcomed with roses ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.