राज्यसभेत व लोकसभेत पक्षाचे पुण्यातील दोन चेहरे; भाजप कार्यकर्त्यांची भावना

By राजू इनामदार | Published: February 14, 2024 05:37 PM2024-02-14T17:37:08+5:302024-02-14T20:16:38+5:30

भाजपात कामाची तसेच पक्षनिष्ठेची कदर केली जाते, याचे उदाहरण डॉ. कुलकर्णी यांच्या उमेदवारीने आता ठळक झाले

The two faces of the party in Rajya Sabha and Lok Sabha in Pune Feelings of BJP workers | राज्यसभेत व लोकसभेत पक्षाचे पुण्यातील दोन चेहरे; भाजप कार्यकर्त्यांची भावना

राज्यसभेत व लोकसभेत पक्षाचे पुण्यातील दोन चेहरे; भाजप कार्यकर्त्यांची भावना

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या शहर शाखेतील कार्यकर्त्यांनी माजी आमदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना पक्षाने दिलेल्या राज्यसभेच्या उमेदवारीचे स्वागत केले. लोकसभेची पुण्यातील जागाही आम्हीच जिंकणार असल्याने दिल्लीत आता पक्षाचे दोन चेहरे असतील, अशी भावना कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. भाजपात कामाची, पक्षनिष्ठेची कदर केली जाते, हे डॉ. कुलकर्णी यांच्या उमेदवारीवरून सिद्ध होते, असा दावा काही पदाधिकाऱ्यांनी केला.

विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर मागील पाच वर्षे डॉ. कुलकर्णी कोथरूड तसेच शहरातील राजकारणापासून काहीशा दूर होत्या. ‘मुक्तछंद’ या त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्या सांस्कृतिक कार्यक्रम करत होत्या. वैयक्तिक स्तरावर त्यांनी काम सुरू ठेवले होते. मागील दोन महिन्यांपासून त्या अचानक पुन्हा पक्षाच्या शहरातील राजकीय वर्तुळात दिसू लागल्या. कोथरूडमधीलच एका अवैध व्यवसायावर त्यांनी फिल्मी स्टाईलने पोलिसांना बरोबर घेत छापा मारला. त्याचवेळी त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार की काय, अशी चर्चा सुरू झाली होती.

मंगळवारी त्यांनी अचानक महापालिकेकडे नो ड्यूज (कराची कोणताही थकबाकी नाही) प्रमाणपत्रासाठी अर्ज केला व बुधवारी सकाळीच पक्षाने त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी लगेचच जल्लोष सुरू केला. पक्षाच्या वतीने शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांच्या समर्थक नगरसेवकांनीही लगेचच त्यांच्या निवासस्थानी जात त्यांना शुभेच्छा दिल्या. कोथरूडमधील त्यांचे समर्थक कार्यकर्तेही यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. कुलकर्णी महापालिकेत नगरसेवक म्हणूनही कार्यरत होत्या. त्यानंतर नगरसेवक असतानाच त्या कोथरूड विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्या. त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत पक्षाने अचानक त्यांना उमेदवारी नाकारली आणि कोल्हापुरातून आलेल्या चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी देण्यात आली. उमेदवारी नाकारल्यानंतरही फारशा तक्रारी न करता डॉ. कुलकर्णी पक्षातच कार्यरत राहिल्या. पक्षाने त्यांना महिला आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद दिले, मात्र, तरीही त्या नाराज असल्याची चर्चा होती. कोथरूडमधील पाटील यांच्यासह पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांचे जमत नव्हते, अशीही चर्चा होती. त्यावरून त्यांचे किरकोळ वादविवादही होत असत.

डॉ. कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाला हे खऱेच होते, मात्र त्यांनी त्यावरून कसलेही आकांडतांडव केले नाही. त्याच विधानसभा निवडणुकीसाठी त्यांना अन्य पक्षांकडून विचारणा झाली होती, मात्र त्यांनी ती ऑफर नाकारली. पक्षाचेच काम करत राहिल्या, त्याचेच फळ त्यांना मिळाले असे त्यांच्या समर्थक नगरसेवकांनी सांगितले. भाजपात कामाची तसेच पक्षनिष्ठेची कदर केली जाते, याचे उदाहरण डॉ. कुलकर्णी यांच्या उमेदवारीने आता ठळक झाले आहे, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

पुणे शहर लोकसभेची जागा तर आम्ही जिंकणारच, त्यामुळे दिल्लीत आता राज्यसभेत व लोकसभेत अशा दोन्ही सर्वोच्च सभागृहात पक्षाचे पुण्यातील दोन चेहरे असतील. प्रा. डॉ. कुलकर्णी सुशिक्षित, संस्कारी तसेच उच्चविद्याविभूषित आहेत. त्यांच्या खासदारकीचा पुणे शहराला समस्या सोडविण्यासाठी नक्की फायदा होईल. धीरज घाटे, शहराध्यक्ष, भाजप.

 

Web Title: The two faces of the party in Rajya Sabha and Lok Sabha in Pune Feelings of BJP workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.