पुणे: अलीकडील काळात सरकारच्या वतीने ग्रंथ प्रदर्शनांचे आयोजन केले जाते. तिथे ‘बंच ऑफ थॉट्स’ सारखे गोळवलकरांचे विचार असलेली पुस्तके असतात. त्यापेक्षा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या भारतीय राज्यघटनेतील विचार महत्वाचे आहेत, त्यांच्या नावाच्या संशोधन संस्थेकडून हे विचार जनतेपर्यंत पोहचवले जातील असा विश्वास ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी व्यक्त केला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संशोधन संस्थेचे उदघाटन पवार यांच्या हस्ते बुधवारी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिरात झाले. ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार निलेश लंके, माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ विचारवंत प्रशांत जगताप व अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
पवार म्हणाले, “भारताच्या भोवतालचे सगळे देश अस्थिर असताना भारत स्थिर आहे याचे कारणच राज्यघटना हे आहे. आव्हाने नाहीत असे नाही. संसदेची नवी वास्तू झाली, पण त्यावर ना चर्चा झाली, ना विचारविनिमय. संसदेत संवाद होणे अपेक्षित आहे. पण डॉ. आंबेडकर यांनी लेखनातून प्रत्येक समस्येवर विचार केलेला दिसतो. कोणत्याही अडचणीच्या वेळी हे विचार मार्ग दाखवतात. त्यामुळेच सत्तेत असताना मी समग्र लेखन प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. देशाला एकसंध ठेवण्यात या विचारांचे योगदान फार मोठे आहे. शेती, वीज, अर्थ अशा प्रत्येक गोष्टीवर डॉ. बाबासाहेबांचे विचार आहेत. या केंद्राने ते जनतेपर्यंत आणावेत.”
केंद्राचे अध्यक्ष माजी आमदार जयदेव गायकवाड यांनी प्रास्तविक केले. अरूण खोरे यांनी स्वागत केले. विजय जाधव यांनी सुत्रसंचालन केले. महात्मा फुले यांच्या अखंड गायनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली.
कार्यक्रमात भारतीय संविधान: संसदीय लोकशाहीपुढील सद्य आव्हाने या विषयावर बोलताना डॉ. रावसाहेब कसबे, प्रा. डॉ. सुहास पळशीकर, ॲड. शारदा वाडेकर यांनी आपली मते व्यक्त केली. संसदीय लोकशाहीपुढे अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत, त्याचा प्रतिकार करणे गरजेचे आहे, तो कसा करावा यासाठी महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्यासारख्या अनेक थोर नेत्यांनी मार्ग दाखवला आहे. त्यासाठी नागरिकांनीही सक्रिय व्हायला हवे असे मत त्यांनी व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात डॉ. आढाव यांनी तोच सूर धरला. २ ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती आहे. त्यादिवशी राज्यात, ते शक्य झाले नाही तर पुणे शहरात किमान ५ ठिकाणी देशाच्या सद्य स्थितीवर नागरिकांकडून त्यांची मते जाणून घेण्याचा उपक्रम आयोजित व्हावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.