पुणे :पुणे महापालिकेकडे या आर्थिक वर्षात आतापर्यंत ८ लाख ७३ हजार मिळकतधारकांनी १८०० कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. या कराची थकबाकी वाढत चालली आहे. त्यामुळे कर वसुलीसाठी महापालिकेने २ डिसेंबरपासून थकबाकीदारांच्या दारात बँड वाजवण्यास सुरुवात केली आहे. याचा धसका थकबाकीदारांनी घेतला आणि चार दिवसांत महापालिकेचा ११ कोटी १९ लाखांचा कर वसूल झाला.महापालिकेकडे एकूण १४ लाख ८० हजार मिळकतधारकांची नोंदणी असून, त्यातील ८ लाख ७३ हजार मिळकतधारकांनी १८०० कोटी रुपयांचा कर जमा केला आहे. उर्वरित ६ लाख ६ हजार मिळकतधारकांनी कोट्यवधीचा कर थकविला आहे. येत्या काही दिवसांत ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार आहे, असे कर संकलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी सांगितले. २३ मिळकती सील पुणे महापालिकेच्या पथकाने २ डिसेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत १५६ मिळकतींना भेट दिली असून, त्यांच्याकडून ११ कोटी १९ लाखांची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. तर २३ मिळकती आतापर्यंत सील करण्यात आल्या आहेत.कर वसुलीवर भरपालिकेच्या कर संकलन विभागास आर्थिक वर्षासाठी २,७२७ कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, या विभागास आर्थिक वर्ष संपण्यास शेवटचे चार महिने राहिले असताना आतापर्यंत १८०० कोटींचा कर मिळाला आहे. त्यामुळे कर वसुलीवर प्रशासनाने भर दिला आहे.
दारापुढं बँड वाजवला अन् चार दिवसांत ११ कोटी वसूल कर; वसुलीसाठी महापालिका प्रशासन आक्रमक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 16:36 IST