टीईटीचा पेपर फुटला?
By Admin | Updated: December 15, 2014 01:54 IST2014-12-15T01:54:53+5:302014-12-15T01:54:53+5:30
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) दोन्ही पेपर फुटले असल्याची चर्चा रविवारी परीक्षार्थींमध्ये सुरू होती.

टीईटीचा पेपर फुटला?
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचे (टीईटी) दोन्ही पेपर फुटले असल्याची चर्चा रविवारी परीक्षार्थींमध्ये सुरू होती. परंतु, टीईटी परीक्षेचा एकही पेपर फुटलेला नाही, राज्यात सर्वत्र सुरळीपणे परीक्षा पार पडली, पेपर फुटला नसल्यामुळे टीईटी परीक्षा पुन्हा नव्याने घेतली जाणार नाही, असे परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट केले आहे.
राज्यातील ४ लाख १४ हजार ८१८ उमेदवार टीईटी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले होते. राज्यातील एकूण १ हजार ३६२ परीक्षा केंद्रांवर टीईटी परीक्षा घेण्यात आली. त्यात ८४६ परीक्षा केंद्रांवर टीईटीचा पेपर एक आणि ५१६ परीक्षा केंद्रांवर टीईटी पेपर दोनची परीक्षा घेण्यात आली. पुण्यातील १४ हजार २०९ विद्यार्थ्यांनी पेपर एक तर १० हजार ३७६ विद्यार्थ्यांनी पेपर दोनच्या परीक्षेसाठी अर्ज केला होता. पेपर क्रमांक एक सकाळी १०.३० ते दुपारी १ या कालावधीत तर पेपर क्रमांक दोन दुपारी २.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेण्यात आला. परंतु, बीड येथील एका विद्यार्थ्याकडे टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका सापडली असल्याची अफवा उठली. तसेच गोंदिया जिल्ह्यातील एका परीक्षा केंद्राची तपासणी करण्यास गेलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनाच एक विद्यार्थ्याला कॉपी करताना पकडले. या दोन्ही विद्यार्थ्यांकडे टीईटीची प्रश्नपत्रिका नव्हती तर त्यांनी अंदाजपंचे काही प्रश्नांची उत्तरे लिहून आणली होती. परंतु, या घटनांमुळे राज्यभर टीईटीचा पेपर फुटला अशी
अफवा पसरली.
राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष व्ही.बी. पायमल म्हणाले, की राज्यात सर्वत्र शांततेत परीक्षा पार पडली. बीड येथे पेपर क्रमांक एकच्या पेपर दरम्यान एका विद्यार्थ्याकडे कॉपी सापडली तर गोंदिया येथे पेपर क्रमांक दोनच्या दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांना एक विद्यार्थी कागदावर उत्तरे पाहून लिहीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यावर कारवाई करण्यात आली. तसेच या विद्यार्थांना पुढील परीक्षेसाठी बसू द्यावे किंवा नाही याबाबतचा निर्णय परीक्षेच्या वरिष्ठ समितीमार्फत घेतला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे उत्तरपत्रिकेची डमीशीट मिळाली त्याची पडताळणी करून पाहिली असता ती मूळ प्रश्नपत्रिकेच्या उत्तरांशी जुळत नसल्याचे आढळून आले. परिणामी राज्यात कोठेही टीईटीची प्रश्नपत्रिका फुटल्याची घटना समोर आलेली नाही. त्यामुळे परीक्षा पुन्हा नव्याने घेण्याचा प्रश्नच उरत नाही. (प्रतिनिधी)