‘टीईटी’चा पेपर व्हॉट्सअॅपवर फुटला
By Admin | Updated: January 17, 2016 03:33 IST2016-01-17T03:33:05+5:302016-01-17T03:33:05+5:30
यंदाच्या वर्षासाठी राज्यात घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर १ पुण्यासह तीन ठिकाणी फुटल्याने शनिवारी एकच खळबळ उडाली. त्यामुळे पेपर १ रद्द करण्यात आला

‘टीईटी’चा पेपर व्हॉट्सअॅपवर फुटला
पुणे : यंदाच्या वर्षासाठी राज्यात घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) पेपर १ पुण्यासह तीन ठिकाणी फुटल्याने शनिवारी एकच खळबळ उडाली. त्यामुळे पेपर १ रद्द करण्यात आला असून, हा पेपर पुन्हा घेण्यात येणार असल्याची माहिती राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त महावीर माने यांनी दिली.
राज्यात यंदा तिसऱ्यांदा शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात आली. गेल्या दोन वर्षांचे निकाल पाहता या परीक्षांचा निकाल ५ टक्क्यांच्या पुढे गेलेला नाही. त्यामुळे ही परीक्षा शिक्षकांमध्ये अत्यंत कठीण मानली जात आहे. या परीक्षेसाठी राज्यातून आॅनलाईन नोंदणी केलेल्या परीक्षार्थींची संख्या ही ३ लाख २५ हजार ९४४ इतकी होती. यापैकी इयत्ता पहिली ते पाचवीसाठी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी असणाऱ्या पेपर एकच्या परीक्षेसाठी १ लाख ९१ हजार ३७० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती, अशी माहिती माने यांनी दिली. पेपर एक हा पाचवीपर्यंतच्या शिक्षकांसाठी तर सहावी ते आठवीसाठी शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी पेपर दोन घेतला जातो.
माने म्हणाले, शनिवारी सकाळी १०.३० वाजता पेपर सुरू होण्याच्या दरम्यानच बीडमध्ये व्हॉट्सअॅपवर एका उमेदवाराकडे पेपर आढळून आला. याची माहिती घेत असतानाच बीडमध्ये आणखी एका ठिकाणी असा प्रकार घडल्याचे समोर आले. तसेच पुण्यात कोथरूड येथेही एका व्यक्तीकडे या पेपर संदर्भातील व्हिडियो क्लिप आढळून आली. ही व्यक्ती परीक्षार्थी नसल्याचेही माने यांनी सांगितले. दरम्यान, धुळ्यातही व्हॉट्सअॅपपवरच पेपर आढळून आला असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. यासंदर्भात कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर बीडमध्ये दोन ठिकाणी तर धुळे जिल्ह्यात एका ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फुटीप्रकरणी गुन्हा दाखल : मोबाईल संभाषणाचा पुरावा सादर
परीक्षेच्या उत्तरपत्रिका एक लाखाच्या मोबदल्यात देण्याचे आमिष दाखवण्यात आल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्याच्या संवादाचे आॅडिओ रेकॉर्डिंग करण्यात आले असून, टीईटीचा पेपर फुटल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. विशेष म्हणजे शनिवारीच टीईटीचा पेपर होता. राजेंद्र विनायकराव गोधने (वय ५४, रा. राणीचा बाग, शासकीय वसाहत, लष्कर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी भारत रामभाऊ कुंभार (रा. वंजारवाडी, ता. भूम, उस्मानाबाद) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोधने हे महाराष्ट्र परीक्षा परिषदेमध्ये उपायुक्त आहेत. शनिवारी ते कार्यालयामध्ये असताना दुपारी सव्वाबाराच्या सुमारास कोथरूड पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक धनंजय कापरे, नितीन सोनकांबळे अशोक शिवाजी रामगुडे (वय २५, रा. मराठा महासंघ सोसायटी, शास्त्रीनगर, कोथरूड) त्यांच्यासह कार्यालयात गेले. त्या वेळी परिषदेचे अध्यक्ष महावीर दामोदर माने, सहायक आयुक्त राजेश क्षीरसागरही उपस्थित होते. त्या वेळी सहायक निरीक्षक कापरे यांनी रामगुडे यांची ओळख करून देत टीईटीचा पेपर फुटल्याची तक्रार केल्याचे सांगितले.
रामगुडे यांनी शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यांना प्रवेशपत्रही मिळालेले आहे. सध्या ते एका मोबाईल कंपनीमध्ये नोकरी करतात. त्यांचा मित्र समाधान ढाकणे यांच्या मोबाईलवरुन ७ जानेवारी रोजी फोन आला होता. ढाकणे यांनी भारत कुंभार नावाचे शिक्षक एक लाख रुपयामध्ये टीईटीची उत्तरसूची देणार आहेत अशी माहिती दिली होती. त्याच दिवशी दुपारी कुंभार यांनीही मोबाईलवर फोन करून परीक्षेचा फॉर्म भरण्याबाबत विचारणा केली. दोन्ही पेपरचे १ लाख तर एका पेपरचे ५० हजार रुपये दिल्यास परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका देण्यात येतील. किंवा रामगुडे यांना चिठ्ठी देऊन त्यांच्याकडून पाठांतर करून घेतले जाईल. यासोबतच शैक्षणिक कागदपत्र्ंही सोबत ठेवावे लागतील, असे कुंभार यांनी सांगितले होते.
रामगुडे यांनी महाराष्ट्र परीक्षा परिषदेला निवेदन दिले असून, त्यांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेले संभाषणही दिले आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत गोधने यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पेपर २ सुरळीत पार
दरम्यान, इयत्ता सहावी ते आठवीसाठीचा घेण्यात येणारा पेपर-२ हा सुरळीत पार पडला असून, त्याबाबत अद्याप तरी कोणतीच तक्रार नाही. त्यामुळे हा पेपर पुन्हा घेण्याची आवश्यकता नसल्याचेही माने यांनी स्पष्ट केले. पेपर-१ हा पुन्हा कधी घेण्यात येईल, याबाबत शासनाचे आदेश येतील व त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल.
शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. याबाबत राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी कडक भूमिका घेतली आहे. येत्या ४८ तासांत तपासणी अहवाल सादर करण्याचे आदेश नंदकुमार यांनी दिले आहेत. यामध्ये कितीही मोठा अधिकारी दोषी असेल तरीही त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री