रानडे इन्स्टिट्यूटमध्येही तणाव

By Admin | Updated: March 23, 2016 01:30 IST2016-03-23T01:30:15+5:302016-03-23T01:30:15+5:30

फर्ग्युसन महविद्यालयात निर्माण झालेल्या वादानंतर दिल्ली येथील जेएनयूचा अभाविपचा अध्यक्ष आलोक सिंग हा आपल्या कार्यकर्त्यांसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रानडे

Tension in Ranade Institute | रानडे इन्स्टिट्यूटमध्येही तणाव

रानडे इन्स्टिट्यूटमध्येही तणाव

पुणे : फर्ग्युसन महविद्यालयात निर्माण झालेल्या वादानंतर दिल्ली येथील जेएनयूचा अभाविपचा अध्यक्ष आलोक सिंग हा आपल्या कार्यकर्त्यांसह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांशी चर्चेसाठी आला. मात्र, यावेळी अनुचित प्रकार घडू नये म्हणून विद्यापीठाच्या परकीय भाषा शास्त्र विभागाच्या प्राध्यापकांनी त्याला प्रतिबंध केला. त्यामुळे आलोक सिंग आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी प्रवेशद्वारावरच बसून राहण्याचा पवित्रा घेतला. परिणामी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
फर्ग्युसन महाविद्यालयातील घटनेची माहिती घेण्यास आलेल्या पोलिसांना अभाविपचा अध्यक्ष आलोक सिंग आणि कार्यकर्ते रानडे इस्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांशी चर्चा करण्यासाठी मंगळवारी सायंकाळी ६ वाजणार असल्याचे समजले होते. त्यामुळे विभागाच्या आवारात पोलिसांचा बंदोवस्त ठेवण्यात आला होता. फर्ग्युसनमधील गोंधळ लक्षात घेऊन परकीय भाषा शास्त्र विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला जोगळेकर यांनी अभाविपच्या कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यास प्रतिबंध केला. परिणामी आलोक सिंगसह अभाविपच्या कार्यकर्त्यांनी बाहेर बसून आतील विद्यार्थ्यांशी चर्चा सुरू केली. विभागप्रमुख डॉ. जोगळेकर यांनी या प्रकाराची माहिती विद्यापीठ प्रशासनाला दिली. त्यावर कोणतीही घोषणाबाजी न करता चर्चा करण्यास विद्यापीठ प्रशासनाने मान्यता दिली. मग कार्यकर्त्यांना प्रवेश देण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांशी काही काळ चर्चा करून त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. दरम्यान, आप पक्षाचे नेते सुभाष वारे यांना विभागाच्या परिसरात विद्यार्थ्यांशी चर्चा करू दिली नव्हती; आता अभाविपला का देण्यात आली? असा सवाल उपस्थित करून रानडेच्या विद्यार्थ्यांनी या घटनेचा निषेध केला.

Web Title: Tension in Ranade Institute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.