‘स्वच्छ’सोबत अन्य पर्याय शोधण्यासाठी राबविणार निविदा प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:16 IST2021-02-17T04:16:00+5:302021-02-17T04:16:00+5:30
पुणे : शहरातील कचरा गोळा करण्याचे वर्षानुवर्षे काम करीत असलेल्या स्वच्छ सेवा सहकारी संस्थेच्या कामाला एक महिन्याची मुदतवाढ दिली ...

‘स्वच्छ’सोबत अन्य पर्याय शोधण्यासाठी राबविणार निविदा प्रक्रिया
पुणे : शहरातील कचरा गोळा करण्याचे वर्षानुवर्षे काम करीत असलेल्या स्वच्छ सेवा सहकारी संस्थेच्या कामाला एक महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर, असे काम करणाऱ्या अन्य संस्थांसाठी निविदा प्रक्रिया राबविणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.
शहरातील कचरा संकलनाचे काम स्वच्छ संस्थेमार्फत केले जाते. पालिका व स्वच्छ सहकारी संस्था यांच्यामध्ये पाच वर्षे मुदतीचा करार केला होता. हा करार त्यानंतर वाढविला. हा करार ३१ जानेवारी २०२० रोजी संपुष्टात आला असून, सन २०२०-२१ पासून पुढील ५ वर्षांसाठी करारनामा करण्याचा प्रस्ताव स्वच्छ संस्थेकडून प्राप्त झाला आहे.
कोरोना कालावधीमध्ये कोरोना आजारासंबंधित विषयांना प्राधान्य देणे आवश्यक होते. त्यामुळे स्वच्छ संस्थेबरोबरील पुढील ५ वर्षांकरिता करार करण्यास विलंब होत आहे.
कोरोनाचे संकट, आचारसंहिता या सर्व पार्श्वभूमीवर मुख्य सभेची मान्यता घेऊन पुढील ५ वर्षांसाठी स्वच्छ संस्थेसोबत करार करण्यास विलंब लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील एक महिन्यासाठी तात्पुरती करारवाढ करण्यास मान्यता मिळावी, असा प्रस्ताव प्रशासनाने ठेवला होता. त्याला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता दिली.
---
प्रशासनाचे नेमके म्हणणे मागवणार
स्थायी समितीकडून स्वच्छ संस्थेसोबतच करार पाच वर्षाकरिता का वाढविण्यात येत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. ठेकेदार आणि जवळच्या कार्यकर्त्यांना पोसण्यासाठी स्वच्छकडून हे काम काढून घेण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप केला जात आहे. तब्बल साडेतीन हजार कष्टकरी लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न यामुळे निर्माण होणार आहे. सत्ताधारी भाजपातील अनेक नगरसेवकांनी स्वच्छ संस्थेला पाठींबा दर्शविला आहे. दरम्यान, प्रशासनाचे यावरील नेमके म्हणणे मागवून घेणार असल्याचे रासने यांनी सांगितले.
-------
...तर कमी दरात पुणेकरांना सेवा मिळेल
स्वच्छ संस्थेकडून निवासी आणि व्यापारी आस्थापनांकडून आकारले जाणारे दर जास्त आहेत. निविदा प्रक्रिया राबविल्यास अशा प्रकारे काम करणाऱ्या अन्य संस्था पुढे येतील. त्यातून स्पर्धा होईल आणि कमी दरात पुणेकरांना सेवा मिळेल असा उद्देश असल्याचे रासने यांनी सांगितले.