बलात्कारप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी
By Admin | Updated: April 26, 2017 02:52 IST2017-04-26T02:52:59+5:302017-04-26T02:52:59+5:30
पाचवीत शिकणाऱ्या अकरावर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा राजगुरुनगर

बलात्कारप्रकरणी दहा वर्षे सक्तमजुरी
दावडी : पाचवीत शिकणाऱ्या अकरावर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला १० वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये
दंडाची शिक्षा राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी आज (दि. २५) ठोठावली. गणेश किसन नवले (वय ३५, रा. पिंपरी पेंढार, ता. जुन्नर) असे
शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी : पिंपरी पेंढार (ता. जुन्नर) येथील सद्गुरु सीताराममहाराज हायस्कूलमध्ये ५ वीत शिकणाऱ्या ११ वर्षीय मुलीस तिच्या नात्यातील आरोपी गणेश किसन नवले याने (१ जानेवारी २०१४ रोजी) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शाळेच्या मधल्या सुटीत पीडित मुलीला खाऊचे आमिष दाखवून जवळच असलेल्या उसाच्या शेतामध्ये नेऊन बलात्कार केला. त्यांनतर त्या मुलीस पुन्हा मोटारसायकलवर बसवून तिच्या शाळेत सोडले.
तिची अवस्था पाहून शाळेतील शिक्षिकेने तिची चौकशी केली असता त्या वेळी पीडित मुलगी जोराने रडू लागली. या वेळी शाळेतील इतर शिक्षिका तेथे आल्या आणि त्यांनी तिला धीर देत काय प्रकार घडला, हे विचारले. पीडित मुलीने झालेला प्रकार शिक्षिकांना सांगितला. शाळेतील शिक्षिकांनी तत्काळ पीडित मुलीच्या आई-वडील आणि नातेवाइकांना सांगितले.
आरोपी गणेश किसन नवले याच्याविरोधात ओतूर पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली. हा खटला राजगुरुनगर येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयात सुरू होता. त्याचा निकाल आज जिल्हा सत्र न्यायाधीश एस. आर. जगताप यांनी दिला.(वार्ताहर)