दहा वर्षांनंतर निधी मिळूनही कामे रखडलेलीच!
By Admin | Updated: April 6, 2016 01:29 IST2016-04-06T01:29:58+5:302016-04-06T01:29:58+5:30
पुणे-सातारा महामार्गाच्या रस्तारुंदीकरणाचे काम करताना अनेक गावांच्या नळपाणी पुरवठा योजनांच्या पाईपलाईन फुटल्या होत्या.

दहा वर्षांनंतर निधी मिळूनही कामे रखडलेलीच!
भोर : पुणे-सातारा महामार्गाच्या रस्तारुंदीकरणाचे काम करताना अनेक गावांच्या नळपाणी पुरवठा योजनांच्या पाईपलाईन फुटल्या होत्या. त्या कामासाठी तब्बल १० वर्षांनी ८० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून पाईपलाईनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला पाईपलाईन टाकण्यास हद्द निश्चित करून दिली जात नसल्याने दोन महिन्यांपासून काम रखडले आहे.
त्याचा परिणाम ९ गावांच्या नळपाणीपुरवठा योजनांवर होत असून, आणखी किती दिवस वाट पाहावी लागणार आहे याची शाश्वती नाही. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण व रिलायन्स इन्फ्रा कंपनीच्या कामाबद्दल नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. काम त्वरित सुरु न झाल्यास त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तब्बल १० वर्षे वाट पाहिल्यावर दोन महिन्यांपूर्वी सुमारे ८० लाख रुपयांची मंजुरी मिळाली आहे.
महामार्गावरील शिंदेवाडी, खेड शिवापूर, वेळू, वर्वे, नसरापूर, कामथडी, कापूरव्होळ,किकवी, सारोळे या गावांतील नळपाणी पुरवठाच्या पाईपलाईन तुटलेल्या होत्या.
१० वर्षांपूर्वी पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावरील रस्तारुंदीकरणाच्या वेळी रस्त्याच्या आजूबाजूने गेलेल्या गावातील नळपाणी पुरवठा योजनांच्या पाईपलाईन फुटल्या होत्या. त्यामुळे गावांसह वाड्या-वस्त्यांवरील पाणीपुरवठा खंडित झाला आहे. तेव्हापासून हे काम करण्याची मागणी स्थानिक शेतकरी करत होते.
मात्र दशकभराने हे काम सुरू होण्याची आशा असताना ठेकेदारास पाईपलाईन जोडण्यासाठी रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराकडून हद्द निश्चित करून मिळत नसल्याने हे काम गेल्या दोन महिन्यांपासून सुरु करता येत नाही.
दुसरीकडे हे काम वेगात सुरू असल्याचे महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सांगतात. मात्र प्रत्यक्ष काम अद्याप सुरुच झाले नसल्याचे दिसून येते. त्यामुळे रस्त्याच्या सहा पदरीकरणाच्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या रिलायन्स इन्फ्रा व महामार्ग प्राधिकरण यांच्यात ताळमेळ नाही. दोघांकडून टोलवाटोलवी सुरूअसल्याचे दिसून येत आहे. या वादात मात्र लोकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.(वार्ताहर)