दहा महिन्यांनंतरही लागला नाही निकाल
By Admin | Updated: February 1, 2016 00:59 IST2016-02-01T00:59:12+5:302016-02-01T00:59:12+5:30
पोस्टमन आणि एमटीएस या पदासाठी टपाल खात्याने गेल्या वर्षी मार्च आणि मे महिन्यात परीक्षा घेतल्या़ या परीक्षा घेणे व त्याचे निकाल लावण्यासाठी टपाल खात्याने

दहा महिन्यांनंतरही लागला नाही निकाल
पुणे : पोस्टमन आणि एमटीएस या पदासाठी टपाल खात्याने गेल्या वर्षी मार्च आणि मे महिन्यात परीक्षा घेतल्या़ या परीक्षा घेणे व त्याचे निकाल लावण्यासाठी टपाल खात्याने आऊटसोर्स केला; पण खासगी सेवा घेऊनही टपाल खात्याला गेल्या १० महिन्यांत या परीक्षांचे निकाल लावता आलेले नाही़ फोन, ई-मेल, प्रत्यक्ष भेटी घेऊनही टपाल कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी कोणतीही दाद देत नाही़ गेल्या अनेक महिन्यांपासून पुढील महिन्यात निकाल लागेल, असे सांगून वेळ मारून नेत असल्यामुळे नोकरीच्या आशेने ही परीक्षा देणारे हजारो तरुण हवालदिल झाले आहेत़
टपाल कार्यालयांचे आधुनिकीकरणाची योजना शासनाने हाती घेतली आहे़ यासाठी प्रामुख्याने टपाल खात्याला मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे़ त्यासाठी पोस्टमनच्या ७०० आणि एमटीएस कर्मचाऱ्यांचे १ हजार पदे भरण्यासाठी मार्च व मे २०१४ मध्ये परीक्षा घेण्यात आली़ केंद्र शासनाच्या नोकरीची संधी मिळत असल्याने या परीक्षेला हजारो तरुणांनी प्रतिसाद दिला़ या परीक्षेची व तिच्या उत्तरपत्रिका तपासून निकाल जाहीर करण्यासाठी टपाल खात्याने आऊटसोर्स करून हे काम खासगी कंपनीकडे सोपविले़ त्यानंतर आतापर्यंत कोणतीही माहिती उमेदवारांना दिली जात नाही़ महाराष्ट्र मंडलाचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल अशोककुमार दास यांनी या परिक्षेचा निकाल महिन्यात जाहीर केला जाईल, असे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सांगितले होते़ त्याला आता २ महिने होऊन गेले दरवेळी पुढील महिन्यात निकाल जाहीर होणार असे सांगितले जाते मात्र ती केवळ आश्वासन ठरतात.